मुंबई: किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर 60 ते 70 जणांच्या जमावाने हल्ला केला. केवळ सीआयएसएफचे जवान होते म्हणून सोमय्यांचा जीव वाचला. नाही तर कदाचित त्याच ठिकाणी सोमय्यांची हत्या झाली असती, असा गंभीर दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी केला आहे. आम्ही गृहमंत्री, गृहसचिवांकडे गेलो असतो. पण ते न्याय देतील असं वाटलं नाही. सरकार सुडाने पेटलेले आहे. सोमय्या भ्रष्टाचार काढत आहेत. म्हणूनच त्यांना गायब करण्याचा डाव होता. राज्यपालांकडे (bhagat singh koshyari) आमची शेवटची आशा आहे. म्हणून त्यांच्याकडे न्याय मागायला आलो. आमचा कायद्यावर विश्वास आहे. कायद्याने झालं नाही तर आम्ही संघर्ष करू. या संपूर्ण प्रकरणाचा राज्य सरकारकडून तात्काळ अहवाल मागावा अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे, अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटल्यानंतर दरेकर मीडियाशी संवाद साधत होते. राज्यपालांना भेटलो. सरकारच्या माध्यमातून पोलिसांच्या मार्फत दहशतवाद केला जात आहे. या गोष्टी राज्यपालांच्या कानावर घातल्या. सोमय्यांनी सर्व सिक्वेन्स सांगितला. एफआयआर खोटा होता. सोमय्यांनी जे सांगितलं त्या व्यतिरिक्त नोंदवून एफआयआर ऑनलाईन केला गेला. तो रद्द करून नवा एफआयआर घ्यायला हवा. सोमय्यांवर 60 ते 70 जणांच्या जमावांनी हल्ला केला. पण गुन्हा सोमय्यांच्या ड्रायव्हर विरोधात दाखल करण्यात आला. हा प्रकार म्हणजे उल्टा चोर कोतवाल को डांटे असाच आहे. नंतर पोलिसांवर दबाव आला म्हणून नावाला महाडेश्वरांवर गुन्हा दाखल केला. काही तरी कारवाई केल्याचं चित्रं निर्माण केलं आणि त्यांना जामीनही दिला, असं दरेकर म्हणाले.
सोमय्यांवर हल्ला होत असताना पोलीस आणि सरकार बघ्याची भूमिका घेत होते. या सर्व गोष्टी पोलीस आयुक्तांच्या आदेशावर चालल्या होत्या. तसं वातवरण सोमय्यांनी पाहिलं. दबावाखाली अॅक्टिव्हिटी होत होत्या. या गोष्टी लोकशाहीला घातक आहेत. झेड सेक्युरिटी असलेल्या सोमय्यांवर हल्ला झाला. ही गंभीर बाब आहे, असं दरेकर म्हणाले. या हल्ल्यानंतर कमांडो काय करत होते? असा सवाल पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी केला हे तर अत्यंत गंभीर आहे. सीआयएसएफने गोळीबार करावा अशी पोलीस आयुक्तांची अपेक्षा होती का? पोलीस आणि सीआयएसएफमध्ये तुंबळ युद्ध व्हावं असं वाटत होतं का? असा संतप्त सवालही दरेकर यांनी केला.