मुंबई: मालाडच्या क्रीडा संकुलाला टिपू सुलतान यांचं नाव देण्याचा वाद काही थांबताना दिसत नाही. या वादावरून आता राजकीय नेत्यांमध्येच जुंपली आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांनी टिपू सुलतान (tipu sultan) हे स्वातंत्र्य सेनानी होते. महान व्यक्तिमत्त्व होते, असा दावा केला आहे. तर मलिक हे मुस्लिम समाजाचेच आहेत. ते हिंदुद्वेष्ट्ये आहेत. त्यामुळे मलिक यांच्याकडून वेगळी अपेक्षाच नाही, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar)यांनी केला आहे. प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मलिक यांच्यावर थेट वार केला आहे. या आधी भाजपचे नेते राज पुरोहित यांनी थेट या प्रकरणी पालकमंत्री अस्लम शेख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच या प्रकरणावरून राज्यात दंगली पेटतील असा इशाराही पुरोहित यांनी दिला होता.
नवाब मलिक यांनी मीडियाशी बोलताना टिपू सुलतान यांचा गौरव केला होता. टिपू सुलतान हे इंग्रजांशी लढले. ते स्वातंत्र्य सेनानी, ते महान व्यक्तिमत्त्व होते. त्यांना बदनाम करण्याचं काम भाजप करत आहे. कर्नाटकात तेच केलं, आधी जयंती साजरी केली मग निवडणुका आल्यावर कार्यक्रम आटोपला असा पलटवार मलिक यांनी केला होता. मुंबईतही भाजपचे नगरसेवक टिपू सुलतानचं नाव रस्त्याला देण्यासाठी प्रयत्न करत होते. संसदेत संयुक्त सभागृहात काय वक्तव्य केलं ते त्यांनी पाहावं. कुठलाही वणवा पेटणार नाही, एखाद्या मुस्लिम व्यक्तीने काही चांगलं काम केलं तर विरोध करायचा हा भाजपचा अजेंडा आहे. ते त्यांचं नित्याचंच काम आहे. हे चालणार नाही असं सांगतानाच राज पुरोहीत दंगल घडवण्याची भाषा करत असून त्याकडे लक्ष द्यावं लागेल, असं मलिक म्हणाले.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही या प्रकरणावरून मलिकांवर जोरदार हल्ला चढवला होता. टिपू सुलतान यांचं नाव आल्यावर मलिक त्यांचं कौतुकच करणार. ते विरोध करण्याचा प्रस्नच येत नाही. केवळ हिंदूच नाही तर ख्रिश्चनांवरही टिपू सुलतानने अत्याचार केले. मुस्लिम समाजाचेच असल्याने नवाब मलिक हे हिंदुद्वेष्ट्ये आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? असा सवाल दरेकर यांनी केला. टिपूने चर्चही सोडलं नाही. काँग्रेस आज लांगूलचालन करत आहे. देशप्रेम, देशभक्ती, राष्ट्रवादापेक्षा या तिन्ही पक्षांना सत्ता महत्त्वाची वाटते. अस्लम शेख हे जबरदस्तीने उद्घाटन करत आहेत. शिवसेना दुटप्पी भूमिका घेत आहे. आदित्य ठाकरे ट्विटर कबुल करतात की नाव दिलं नाही. मग पालकमंत्री तिथे जाऊन उद्घाटन कसं करतात? असा सवालही त्यांनी केला.
भायखळ्यात आयटीआयसाठी आरक्षित असलेल्या जागेवर ऊर्दु भाषा भवन उभारण्याचं कारण काय? हे लांगूलचालन नाही तर दुसरं काय? आरक्षण गैरप्रकारे बदलून ऊर्दू भाषा भवन करण्याचं कारण काय? केवळ मुस्लिम समाजाची मते मिळवण्यासाठी हे सुरू नाही का? अस्लम शेख मालाड मालवणीत हे उद्घाटन करत आहेत. त्यामुळे मलिक यांनी यावर बोलू नये. मलिक यांच्या नसानसात, रक्तारक्तात हिंदूद्वेष भरला आहे. आणि लांगूलचालन करत आहेत, आम्ही नाही, असा हल्ला दरेकर यांनी चढवला होता.
दरेकरांची पत्रकार परिषद झाल्यानंतर मलिक यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन दरेकरांवर पलटवार केला आहे. आता एखादा शहीद, ज्याने इंग्रजाशी लढताना प्राण गमावले. ज्याच्या नावाने इंग्रज सरकार घाबरत होते. अशा एखाद्या शहिदांच्या नावाला आक्षेप घेणे म्हणजे राजकीय आरोप आहेत. दरेकर साहेब, मजूर सोसायट्यांचा घोटाळा करणे आणि इतिहास समजणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. इतिहास माहीत नसेल तर कोविंद साहेबांच्या घरी जा आणि त्यांना विचारा. कर्नाटक विधानसभेत तुम्ही काय भाषण केलं. त्याचा संदर्भ काय त्यांना विचारा. राष्ट्रपती भवनात जा. ठिय्या आंदोलन करा, राष्ट्रपतींचा विरोध करा, असा हल्ला मलिक यांनी चढवला. भाजप खोटी माहिती पसरवत आहे. सत्य काय आहे हे जनतेला माहीत आहे. त्यांनी कितीही राजकारण केलं तरी देशातील जनता भाजपला भुलणार नाही, असं ते म्हणाले.
संबंधित बातम्या:
Tipu Sultan: दंगल करून दाखवाच, इथे ठाकरे सरकार आहे; संजय राऊत यांचं भाजपला आव्हान