मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमी येथे करण्यात येत असलेल्या तयारीचा आढाव घेण्यात आलाय. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार यांनी चैत्यभूमीवरील तयारीची पाहणी केली आहे. येथे पुष्प सजावट, सुरक्षाविषयक कामे जवळजवळ पूर्ण झाली आहेत. यावेळी कुमार यांनी थेट प्रक्षेपण व्यवस्थेची त्याचबरोबर डॉ. बाबासाहेबांचे निवास असलेले राजगृह आणि परळ येथील बीआयटी चाळ या ठिकाणी करण्यात आलेल्या व्यवस्थेचीदेखील पाहणी केली.
दादर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्यभूमी स्मारक आहे. दरवर्षी महापरिनिर्वाणदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून चैत्यभूमी येथे अनुयायी येतात. त्यानिमित्ताने चैत्यभूमी परिसरात रंगरंगोटी, दिवाबत्ती, पुष्प सजावट आदी कामे केली जातात. तसेच, डॉ. बाबासाहेबांचे निवास असलेले राजगृह आणि परळ येथील बीआयटी चाळ या ठिकाणी देखील अनुयायी भेट देत असल्याने तेथेही व्यवस्था करण्यात येते. प्रतिवर्षाप्रमाणे ही सर्व कामे पूर्णत्वास आली असून त्याची पाहणी डॉ. संजीव कुमार यांनी केली. पोलीस प्रशासनाच्या तयारीची पाहणीदेखील त्यांनी पोलीस उपआयुक्त प्रणय अशोक यांच्यासह केली.
कोविड-19 विषाणू संसर्ग नियंत्रणात आला असला तरी कोविडच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकाराचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे दक्षता बाळगणे आवश्यक झाले आहे. ओमायक्रॉन हा अत्यंत वेगाने संक्रमित होणारा कोविड विषाणू प्रकार असल्याने, नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येणे धोक्याचे ठरू शकते. या पार्श्वभूमीवर देशभरातील अनुयायांनी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे न येता आपापल्या घरी राहून तसेच स्थानिक परिसरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन शासनाकडून आणि प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रत्यक्ष चैत्यभूमीवर न येता देखील अनुयायांना अभिवादन करता यावे यासाठी चैत्यभूमीवरील शासकीय मानवंदना व पुष्पवृष्टीचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
इतर बातम्या :