मी मुंबईत असेन… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं खास मराठीत ट्विट काय; आणखी काय म्हणाले?

| Updated on: Jan 19, 2023 | 6:58 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास मराठीत ट्विट केलं आहे. मी मुंबईत असेन. 38,000 कोटी रु. खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी केली जाणार आहे.

मी मुंबईत असेन... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं खास मराठीत ट्विट काय; आणखी काय म्हणाले?
Narendra Modi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. तसेच काही विकास कामांचं लोकार्पणही करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने मुंबईत एका विराट सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी मोदी काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून मी मुंबईत असेन, असं ट्विट करून आजच्या दौऱ्याची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.

हे सुद्धा वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास मराठीत ट्विट केलं आहे. मी मुंबईत असेन. 38,000 कोटी रु. खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी केली जाणार आहे. यामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी सुधारणे, रेल्वे पायाभूत सुविधा, सांडपाणी प्रक्रिया तसेच आणखी कामांचा समावेश आहे. या कामांमुळे राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास चालना मिळेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पंतप्रधानांच्या या ट्विटला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिप्लाय दिला आहे. मुंबई नगरीत आपले मन:पूर्वक स्वागत आहे. आपल्या शुभ हस्ते मुंबईतील विविध महत्त्वकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे.

या माध्यमातून मुंबईचा नक्कीच कायापालट होणार आहे, हा विश्वास आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तर, शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनीही आपलं मुंबईत स्वागत असं ट्विट करून मोदींचं स्वागत केलं आहे.

 

मुंबईतील बीकेसी मैदानावर आज दुपारी 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट सभा पार पडणार आहे. यावेळी मोदी विविध विकासकामांचं भूमिपूजन करणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे मोदींच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज्यात मुंबई, ठाणे आणि पुण्यासह 14 महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या महापालिका जिंकण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातही भाजपला मुंबई महापालिका जिंकायची आहे. त्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. आजची मोदींची सभा ही महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकणारी असेल असं सांगितलं जात आहे.

या सभेच्या माध्यमातून भाजप आणि शिंदे गट शक्तीप्रदर्शन करणार आहेत. तसेच मोदी या सभेच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी काही खास घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळेही मोदींच्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.