मुंबई | 28 जुलै 2023 : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह शब्द वापरले आहेत. महात्मा गांधी यांचे खरे वडील मुस्लिम जमीनदार होते. मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते, असे तारे मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी तोडले आहेत. त्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही त्याचे संतप्त पडसाद उमटले. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या मुद्द्याकडे विधानसभेचं लक्ष केंद्रीत केलं. यावेळी मनोहर भिडे यांना अटक करण्याची मागणी केली. पृथ्वीराज चव्हाण हे विधानसभेत चांगलेच संतप्त झाले होते.
काल अमरावतीत संभाजी भिडे नावाच्या एका गृहस्थाने राष्ट्रपित्याबद्दल अत्यंत निंदापूर्वक, नालस्तीपूर्वक विधान केलं आहे. आपण त्याची माहिती घेतली असेल. अशा प्रकारची समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीला आयपीसी 153 किंवा जो काही कलम असेल त्यानुसार ताबडतोब अटक केली पाहिजे. समाजात दंगेधोपे आणि तणाव निर्माण करण्याचा या व्यक्तिचा जाणूनबुजून प्रयत्न असतो. हा पहिल्यांदाच केला नाही. यापूर्वीही त्यांनी असा प्रयत्न केला आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.
या व्यक्तिने जर राष्ट्रपित्याबद्दल इतकं निंदाजनक वक्तव्य केलं असेल तर हा माणूस बाहेर कसा फिरू शकतो? त्यावर काही पडसाद उमटले तर त्याला जबाबदार कोण असू शकतो? ताबडतोब या व्यक्तिला अटक करा, अशी मागणीच चव्हाण यांनी केली. यावेळी चव्हाण प्रचंड भडकले होते. चव्हाण यांचा पारा अधिकच चढला होता. चव्हाण यांच्या मागणीला काँग्रेसच्या इतर आमदारांनी पाठिंबा दिला.
चव्हाण यांच्या या मागणीची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दखल घेतली. माहिती घेऊन या प्रकरणी उचित कारवाई केली जाईल, असं नार्वेकर म्हणाले. मात्र, चव्हाण यांचं या उत्तराने समाधान झालं नाही. त्यांनी पुन्हा हा मुद्दा लावून धरला. काँग्रेसच्या सदस्यांनी यावेळी सभागृहात गोंधळ केला. तेव्हा विधानसभा अध्यक्षांनी आपल्या आसनावर उभं राहून या प्रकरणी कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं.
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलायला उभे राहिले. मी या प्रकरणाची नोंद घेतली आहे. या प्रकरणाची शहानिशा करू. तपास करून योग्य ती कारवाई करू. अध्यक्षांनी सूचना दिल्या आहेत. तपासणी होईल. गांभीर्य पाहू आणि कारवाई करू, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं.
यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही भिडे यांच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. संभाजी भिडे ही विकृती आहे. त्यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात अत्यंत अवमानकारक विधान केले आहे. जे समग्र देशासाठी अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. संभाजी भिडे वारंवार असं बोलतो, त्याला पाठीशी नेमका कोण घालतो याचा शोध घेणे आवश्यक आहे.
भिडे यांचा हेतू महाराष्ट्राचे वातावरण अस्थिर करण्याचा आहे हे ओळखले पाहिजे. कोणाच्या राजकीय फायद्यासाठी तो वारंवार अशी विधाने करतो? आम्ही सभागृहात संभाजी भिडेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरकारने आजच या विषयावर कारवाई करावी आणि सभागृहाला सूचित करावे. अन्यथा आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला.