अभिजित पोते, पुणे : एसटी महामंडळाने प्रदूषण कमी करण्यासाठी आपल्या ताफ्यात ई -शिवनेरीचा समावेश केला आहे. एसटी महामंडळाने मुंबई ते पुणे मार्गावर नुकतेच ईलेक्ट्रीक गाड्यांचा समावेश केला. या ई शिवनेरी बसच्या सेवेला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. दादर ते पुणे इलेक्ट्रीक बस सेवा दर पंधरा मिनिटांनी चालविण्यात येत असून तिचे तिकीट दर डिझेलवरील शिवनेरीपेक्षा कमी आहेत. यामुळे या शिवनेरी बसेला पुणेकरांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे.
ई शिवनेरी बस सेवेला पुणेकरांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मे महिन्यात पुण्यातून ई शिवनेरीला १ कोटी पेक्षा अधिक रुपयांची उत्पन्न मिळाले आहे. ई शिवनेरीमधून 1 ते 30 मे दरम्यान पुण्यातून 27 हजार 226 प्रवाशांनी प्रवास केला आहे. एसटी महामंडळाला त्यातून 1 कोटी 44 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पुण्यातून रोज 18 ई शिवनेरी बसेस धावतात. पुणे-मुंबई दरम्यान रोज हजारो प्रवाशी प्रवास करतात. रेल्वेमध्ये आरक्षण उपलब्ध नसणे किंवा सोयीच्या भागात बस जात असल्यामुळे अनेक जण बस प्रवासाला प्राधान्य देतात. त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाची शिवनेरी बससेवा चांगलीच लोकप्रिय झाली आहे.
एसटी महामंडळाने एसटीच्या ताफ्यात इलेक्ट्रीक शिवनेरीचा समावेश नुकताच करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 1 मे महाराष्ट्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर ठाणे ते पुणे मार्गावर ई शिवनेरीची सुरूवात केली होती. एसटी महामंडळाने दादर ते पुणे मार्गावर 20 वर्षांपूर्वी 2002 मध्ये वातानुकूलित शिवनेरी सेवा सुरु होती. त्यानंतर शिवनेरी हा एसटी महामंडळाचा अत्यंत प्रतिष्ठीत ब्रँड बनला. आता मुंबई ते पुणे मार्गावरील सर्व डिझेल शिवनेरींना इलेक्ट्रीक शिवनेरीतमध्ये रूपांतरीत करण्यात आले. शिवनेरीच्या दादर ते पुणे प्रवासाचे भाडे 515 रूपये आहे. तर सवलतीचे अर्धे तिकीट 275 रूपये आहे.
दादर ते पुणे मार्गावर सध्या दर पंधरा मिनिटांनी शिवनेरी बसेस सुटतात. दादर ते पुणे ईलेक्ट्रीक शिवनेरीसाठी परळ येथे इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. दादरहून पहिली बस सकाळी 5.15 वाजता सुटते. त्यानंतर दर पंधरा मिनिटांनी बस सुटते. शेवटची बस सायंकाळी 6.31 वाजता सुटते.
1 जून 1948 या दिवशी पहिली एसटी बस पुणे-अहमदनगर या मार्गावर धावली. त्यानंतर राज्य परिवहन महामंडळाने काळाच्या बदलाप्रमाणे बससेवेत बदल केला. आता आकर्षक रंगसंगती तसेच किफायतशीर आणि आरामदायी प्रवास यामुळे नवीन बस प्रवाशांच्या पसंतीस पडत आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर, वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच प्रवाशांना चांगली वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने एसटीच्या ताफ्यात विद्युत प्रणालीवर धावणारी इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत.