पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरुन हजारोंच्या संख्येने वाहन जात असतात. या मार्गावर शनिवार अन् रविवारी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. सुट्टीच्या दिवशी वाहनांची संख्या वाढल्यामुळे वाहतूक कोंडी होत असते. आता या मार्गावर वेग मर्यादा बदलण्यात आली आहे. घाट क्षेत्रामध्ये वेग मर्यादा वेगळी करण्यात आली आहे. या बदलाची अधिसूचना वाहतून शाखेचे अप्पर पोलीस महासंचालक सुखविंदर सिंह यांनी काढली आहे. यामुळे मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करताना सर्व प्रकारच्या वाहन चालकांनी या वाहतूक वेग मर्यादेचे पालन करणे अनिवार्य आहे.
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर किलोमीटर क्रमांक ३५.५०० ते किमी ५२.०० हा भाग घाट क्षेत्र आहे. तसेच उर्वरित भाग समतल भाग आहे. घाटक्षेत्रासाठी वाहनांसाठी असणारी वेगमर्यादा बदलण्यात आली आहे. बोरघाट आणि उर्वरित मार्गावर ही वेगमर्यादा वेगवेगळी करण्यात आली आहे. जी प्रवासी वाहनाने चालकासह आठ प्रवासी वाहतूक करतात त्यांना एम एक श्रेणी दिली गेली आहे. या वाहनांसाठी घाटातील वेगमर्यादा 60 किलोमीटर तर उर्वरित मार्गावर 100 किलोमीटर प्रतितास करण्यात आली आहे.
प्रवासी वाहनांमधून चालकासह नऊ आणि त्यापेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केली जाते, ती वाहने एम दोन व एम तीन या श्रेणीत येतात. या वाहनांसाठी घाट भागात 40 किलोमीटर तर इतर भागात 80 किलोमीटर प्रतितास अशी मर्यादा ठरवण्यात आली आहे. तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी घाट क्षेत्रात 40 किलोमीटर तर इतर भागात 80 किलोमीटर प्रतितास अशी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
पुणे-मुंबई महामार्गावर वेग मर्यादा निश्चित केली आहे. या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना दंड आकरण्यात येणार आहे. महामार्गावर लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून हा दंड होणार आहे. एक्स्प्रेस वे वर सर्वत्र गॅन्टी उभारण्यात आले आहे. त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहे. आता संपूर्ण एक्स्प्रेस वे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आला आहे. यामुळे वेग मर्यादेचे उल्लंघन न करता वाहन धारकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.