पुणे : प्रजासत्ताक दिनाचे औचित्यसाधत महाराष्ट्रात ठाकरे सरकारच्या महत्त्वकांक्षी अशा शिवभोजन थाळी योजनेचा शुभारंभ करण्यात आला (Shiv Bhojan Thali get good response in Pune). या योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना फक्त 10 रुपयांत भोजन मिळत आहे. ही योजना सुरु होण्याच्या अवघ्या तीन दिवसांतच या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पुण्यात तर शिवथाळी घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागत आहेत आणि या रांगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन शस्त्रधारी पोलीस तैनात करण्यात आले आहेत (Shiv Bhojan Thali get good response in Pune).
पुण्यात सात शिवभोजन केंद्र सुरू आहेत. या सर्वच शिवभोजन केंद्रांवर कमी-अधिक प्रमाणात गर्दी असते. सर्वच शिवभोजन केंद्रावर जेवणासाठी नागरिकांची गर्दी असते. केवळ दहा रुपयात जेवण मिळत असल्यानं नागरिकांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र मार्केट यार्डला तुफान गर्दी होत आहे. तिथं राज्यभरातून मोठ्या संख्येने शेतकरी शेतमाल घेऊन येतात. त्याचबरोबर हमाल, छोटे व्यापारी आणि कष्टकऱ्यांची मोठी संख्या आहे. त्यामुळे केंद्र सुरू होण्यापासूनच रांगाच रांगा दिसतात.
पहिल्या दिवशी शिवथाळीला प्रतिसाद कमी मिळाला. मात्र दुसऱ्या दिवसापासून इथं मोठ्या प्रमाणात रांगा लागू लागल्या. गर्दीमुळे वाद-विवाद झाल्यानं केंद्र चालकांना थेट पोलिसांना पाचारण करावं लागलं.
रांगेत उभं राहून भोजनथाळी न मिळाल्याने नागरिक नाराज
पुण्यात 12 ते 2 या वेळेत शिवभोजन थाळीचा कालावधी आहे. मार्केट यार्डला पुण्यासह अहमदनगर, सांगली, सातारा, कोल्हापूरवरुन मोठ्या प्रमाणात शेतकरी येतात. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने नागरिकांची गर्दी होत आहे. दरम्यान, रांगेत उभं राहून भोजन थाळी मिळत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर “थाळीची संख्या वाढवावी, अन्यथा ही योजना बंद करावी”, अशी टोकाची भूमिका काही नागरिकांनी व्यक्त केली.
पुण्यात दर दिवसाला 150 थाळी
पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या योजनेचा शुभारंभ केला होता. “पुण्यात सामान्य माणसाला पोटभर जेवणासाठी ही योजना सुरु करण्यात आली. दररोज 100 ते 150 थाळी देण्यात येतील. यावेळी काही त्रुटी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र वेळोवेळी माहिती घेऊन यात सुधारणा करु”, असे अजित पवार म्हणाले होते. पुण्यात शिवभोजन थाळीचे उद्धाटन केल्यानंतर काही मिनिटांतच जेवणासाठी नागरिकांनी रांग लावली होती. त्यामुळे पुण्यात ही योजना यशस्वी होताना दिसत आहे.