मुंबई | 31 ऑगस्ट 2023 : काँग्रसचे खासदार राहुल गांधी इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांनी मुंबईत दाखल झाल्यानंतर लगेच पत्रकार परिषद घेतली. त्यांनी या पत्रकार परिषदेत उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावांचा उल्लेख करत आरोपांचा नवा बॉम्ब टाकला आहे. विशेष म्हणजे त्यांनी याबाबतचे आरोप करत असताना काही वृत्तपत्रांच्या बातम्यांचा देखील उल्लेख केला आहे. याशिवाय भारताच्या प्रतिष्ठेचा हा प्रश्न आहे. जी 20 च्या परिषदेला विदेशातून येणारे सदस्य काही प्रश्न उपस्थित करत आहेत. तसेच ज्या वृत्तपत्रांमध्ये वृत्त छापून आलंय, त्यांच्याकडे सर्व पुरावे आहेत, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.
“जी 20 च्या बैठकीसाठी वेगवेगळ्या देशाचे सदस्य येत आहेत. देशातल्या दोन प्रसिद्ध आर्थिक वृत्तपत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अदानी कुटुंबाशी संबंध आहे. अदानी कुटुंबियांनी आपल्या शेअर्समध्ये सिक्रेटली गुंतवणूक केली आहे. या परिवाराने आपले पैसे गुंतवले, असं द गार्डियन वृत्तपत्राने म्हटलं आहे. तर दुसऱ्या ‘फायनान्शियल टाईम्स’ वृत्तपत्रातही म्हटलं तसं म्हटलं आहे”, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
“1 बिलियन डॉलर भारतातून अदानींच्या कंपनींच्या नेटवर्ककडून वेगवेगळ्या देशात गेला आणि देशात आला. त्यातून अदानी यांनी आपले शेअर्सची किंमत वाढवली. त्याच किंमतीच्या फायद्यातून अदानी विमान, पोर्ट विकत घेत आहेत. त्यांना धारावीत मोठा प्रोजेक्ट मिळाले आहेत”, असा आरोप राहुल गांधींनी केलाय.
“अदानी यांना या पैशातून शेअर्सच्या किंमती फुगवून मिळत आहेत. हा पैसा जो वापरला जातोय तो कुणाचा आहे? अदानींचा आहे की दुसरा कुणाचा आहे? दुसरा कुणाचा आहे तो कुणाचा आहे? या कामाचे मास्टरमाईंट विनोद अदानी आहेत, जे गौतम अदानी यांचे भाऊ आहेत. एकाचं नाव नासर शबान अली आणि दुसरा चिनी व्यक्ती आहे. अदानी भारतातले इन्फ्रास्ट्रक्चर खरेदी करत आहेत तर चिनी व्यक्तीचा संबंध काय? हे पैसे भारताच्या शेअर मार्केटवर कसा परिणाम करत आहे? विशेष म्हणजे चिनी व्यक्तीची भूमिका काय आहे?”, असे प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केले आहेत.
“अदानींच्या विरोधात सेबीचा तपास झाला होता. ज्यांनी क्लिनचीट दिली, ज्या व्यक्तीने तपास केला, अदानींच्या चॅनलचे ते डिरेक्टर आहेत. याचाच अर्थ हे एक नेटवर्क आहे. सेबीचा चेअरमन क्लीनचीट देतो आणि नंतर अदानी यांच्या कंपनीत डायरेक्टर बनतो. आंतरराष्ट्रीय विषय आहे. या सर्व घडामोडींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच का करत नाहीत? नरेंद्र मोदी आणि अदानी यांचं नातं आहे, असं वृत्तपत्र म्हणत आहेत. काय नातं आहे? ते त्यांनी जाहीर करावं. ईडी अदानी यांच्यावर रिसर्च का करत नाही? हा मोठा सवाल आहे. भारताच्या प्रतिष्ठेचा विषय आहे”, असं राहुल गांधी म्हणाले.