मुंबई | 17 मार्च 2024 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज भाजपवर निशाणा साधला. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज मुंबईत समारोप झाला. या निमित्ताने मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर इंडिया आघाडीची भव्य सभा पार पडली. या सभेला देशभरातील इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते. या सभेत राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लोबोल केला. “आम्ही भाजपविरोधात लढत आहोत. आम्ही सर्व एका राजकीय पक्षाविरोधात लढतोय असं लोकांना वाटतं. देशालाही तसंच वाटत. पण ते सत्य नाही. हे चूक आहे. आम्ही राजकीय पक्षाविरोधात लढत नाही. देशातील तरुणांनी ही गोष्ट समजून घ्यावी. काहींना वाटतं एका व्यक्तीच्या विरोधात आम्ही लढत आहोत. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढत आहोत. नाही. आम्ही भाजपच्या विरोधात लढत नाही. एका व्यक्तीच्या विरोधात लढत नाही. एका व्यक्तीला चेहरा बनवून बसवलं आहे. हिंदू धर्मात शक्ती शब्द असतो. आम्ही शक्तीच्या विरोधात लढत आहोत. एका शक्तीच्या विरोधात लढत आहोत”, असं राहुल गांधी म्हणाले.
“आता ती शक्ती काय आहे? हा सवाल आहे. कुणी तरी म्हणालं, राजाची आत्मा ईव्हीएममध्ये आहे. बरोबर आहे. राजाची आत्मा ईव्हीएममध्ये आहे. भारताच्या प्रत्येक संस्थेत आहे. ईडीत, आयटी, सीबीआयमध्ये आहे. या राज्यातील एका वरिष्ठ नेत्यांना काँग्रेस पक्षाला सोडलं. आणि माझ्या आईला रडत म्हणाला, सोनियाजी, मला लाज वाटतेय माझ्यात या लोकांशी लढण्याची हिंमत नाही. या शक्तीशी लढायचं नाही. मला तुरुंगात जायचं नाही. एक नाही असे हजारो लोक घाबरवलेले आहेत”, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
“शिवसेना, एनसीपीचे लोक असेच गेले. तुम्हाला काय वाटतं. नाही. त्या शक्तीने या लोकांचा गळा पकडून त्यांना भाजपमध्ये नेलं. ते सर्व घाबरून गेलेत. चार हजार किलोमीटर चाललो. त्यानंतर सहा हजार किलोमीटर मणिपूर ते मुंबई. धारावीपर्यंत. यावेळी जे पाहिलं, ऐकलं ते मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही”, असं राहुल गांधी म्हणाले.
“कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आम्ही यात्रा केली. यात्रा करावी लागली. २००४मध्ये, २०१०मध्ये,. २०१४ मध्ये मला चार हजार किलोमीटर कन्याकुमारीहून काश्मीरपर्यंत जावं लागेल, असा मी विचार केलाच नसता. ही यात्रा आम्हाला का करावी लागली. कारण देशातील संवादाचं जे माध्यम आहे, मग मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, आज देशाच्या हातात नाही. जनतेचे मुद्दे आहेत, बेरोजगारी, हिंसा द्वेष, महागाई, शेतकऱ्यांचे मुद्दे, जवानांचे मुद्दे, अग्निवीरचे मुद्दे हे मुद्दे तुम्हाला मीडियात दिसणार नाहीत. त्यामुळे आम्हाला ही यात्रा करावी लागली. कारण काहीच पर्याय नव्हता”, असा दावा राहुल गांधींनी केला.
“देशाचं लक्ष वळवण्यासाठी विरोधकांना चार हजार किलोमीटर… केवळ राहुल गांधी चालले नाहीत. सर्व पक्षाचे नेते आले, भारतातील सर्व विरोधी पक्ष या यात्रेत सामील झाले. शरद पवार आले, उद्धव ठाकरे आले, तेजस्वी आले. सोशल मीडियात तुम्ही चुकीच्या संभ्रमात राहू नका. सोशल मीडिया हा मार्ग नाही. त्यावरही कंट्रोल आहे. अमेरिकेच्या कंपन्यांवर दबाव आहे”, असा मोठा दावा राहुल गांधींनी केला.