मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर विरोधी पक्षाची आघाडी मजबूत असून आम्ही भाजपविरोधात एकत्रितपणे लढणार असल्याचं स्पष्ट केलं. तसेच इतर राजकीय पक्षांशी संपर्क करणार असल्याचंही पवार यांनी सांगितलं. दिल्लीतील ही राजकीय घडामोड ताजी असतानाच आता राहुल गांधी हे उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मुंबईत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि शिवसेनेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. भेटीची तारीख गुलदस्त्यात असून या राजकीय भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट होण्याची दाट शक्यता आहे. राहुल गांधी मुंबईत येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही सांगितलं जात आहे. तसं झाल्यास मुंबईत येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणारे गांधी कुटुंबातील राहुल गांधी हे पहिलेच नेते ठरणार आहेत. तसेच राहुल गांधी यांच्या भेटीने उद्धव ठाकरे यांचं राजकीय वजनही अधोरेखित होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
राहुल गांधी यांनी मै गांधी हूँ, सावरकर नही, असं म्हणत भाजपला डिवचलं होतं. राहुल गांधी यांच्या या विधानावर ठाकरे गटानेही नाराजी व्यक्त केली होती. संजय राऊत यांनी मध्यंतरी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेऊन ही नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर राहुल गांधी आता थेट मुंबईत येणार असल्याने या भेटीत सावरकर मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भेटीतून काँग्रेस आणि ठाकरे गटात कोणताही बेबनाव नसल्याचंही दाखवलं जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी राहुल गांधी विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना भेटत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांची मोट बांधण्यावर सध्या राहुल गांधी यांनी भर दिला आहे. जेडीयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री आणि आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांची नुकतीच राहुल गांधींसोबत भेट झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली होती. विरोधी पक्षांचे ऐक्य हा या भेटीं मागचा मुख्य हेतू होता. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच विरोधी पक्षांच्या या भेटीगाठी वाढल्याचं सांगितलं जात आहे.
राहुल गांधी लवकरच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटण्याची दाट शक्यता आहे. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट होण्याची दाट शक्यता आहे. ठाकरे-गांधी भेटीचं ठिकाण अद्याप नक्की झालेलं नाही. या भेटीत स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाचे सूत्र यासह विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.