नंदकिशोर गावडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 15 जानेवारी 2024 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल दिल्यानंतर त्यावर विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा निकाल भाजपधार्जिणा असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र दाखवत नार्वेकर यांच्या निकालाचा पर्दाफाश केला होता. तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही उद्या पत्रकार परिषद आयोजित केली असून यावेळी ते नार्वेकर यांच्या निकालाची चिरफाड करणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांचे सर्व आरोप एका झटक्यात फेटाळून लावले आहेत. तसेच परब यांनी दाखवलेल्या पत्राचाही एका वाक्यात निकाल लावला आहे.
राहुल नार्वेकर यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्व आरोपांची उत्तरे दिली आहेत. अनिल परब यांनी दाखवलेल्या पत्रावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माझ्याकडे ते पत्र देण्यात आलेलं आहे. 4 एप्रिल 2018 च्या पत्रात केवळ पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांचे निकाल आयोगाला कळवण्यात आले होते. घटना बदला बाबत त्या पत्रात काहीही नव्हतं, असा दावाच राहुल नार्वेकर यांनी केला आहे. त्यामुळे परब यांचं हे पत्र सर्वोच्च न्यायालयात किती टिकेल याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
ठाकरे गटाचे आमदार अपात्र करावेत म्हणून शिंदे गटाने याचिका दाखल केली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी कुणाला संतुष्ट करायला निकाल दिला नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या तत्त्वानुसार निकाल दिला आहे. भारतातील कुठलाही नागरिक न्यायालयात दाद मागू शकतो. याचिका गेली म्हणजे निकाल चुकीचा म्हणता येणार नाही. निकालात काय चुकीचं आहे हे न्यायालयात दाखवून द्यावं लागेल, असं सांगतानाच 2018 मध्ये जी घटना दुरुस्ती केली ती ग्राह्य धरायची की 1999 ची ग्राह्य धरायची हा निकालातील महत्त्वाचा मुद्दा आहे, असं नार्वेकर यांनी सांगितलं. माझे फोटो व्हिडीओ दाखवण्यापेक्षा घटना दुरुस्तीकडे लक्ष दिलं असत तर बरं झालं असतं, असा टोलाही त्यांनी लगावला.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उद्या पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे हे नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाची चिरफाड करणार आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी की नाही हा त्यांचा प्रश्न. पत्रकार परिषद घेऊन निर्णय बदलणार नाही. माझ्या निर्णयात बेकायदेशीर काय ते सांगा. जर केवळ टीका आणि आरोप करत असतील तर जनता सूज्ञ आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.