मुंबई – अंडरवर्ल्ड डॉन (Underworld Don Dawood)दाऊद इब्राहिमच्या नीकटवर्तीयांवर राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने (NIA)छापे घातले आहेत. मुंबईत एकूण २० ठिकाणी ही छापेमारी सुरु आहे. या छापेमारीच्या कक्षेत दाऊदा साथीदार छोटा शकील (Chota shakil), जावेद चिकना, टायगर मेनन, इक्बाल मिर्ची, दाऊदची बहीण हसीना पारकर यांच्याशी संबंधित व्यक्ती आणि नातेवाईक यांचा समावेश आहे. या छापेमारीत मोठी कारवाई करत एनआयएने माहीम आणि हाजी अली दर्गाचे ट्रस्टी सुहैल खंडवानी यांनाही ताब्यात घेतले आहे. सुहैल खंडवानी हे टचवुड रिएल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक हेही २००६ ते २०१६ या कालावधीत या फर्मचे संचालक होते. या कंपनीत फराज यांच्यासह फारुक आणि जकारिया दरवेश हेही पार्टनर आहेत. एनआयएची टीम यांचीही चौकशी करण्याची शक्यता आहे. १५० कोटींच्या बँकेतील अफरातफरी प्रकरणात सीबीआयकडून याफर्मची चौकशी सुरु आहे.
एनआयएची टीम मुंबईच्या गोवावाला कंपांऊंडमध्येही छापेमारी करते आहे. याच ठिकाणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचेही घर आहे. सध्या मलिक अटेकत आहेत. दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्याकडून जमीन खरेदी केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.
दुसरीकडे एनआयएने दाऊद गँगशी संबंधित छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रूट यालाही ताब्यात घेतले आहे. सलीम याच्या घरी आणि इतर ठिकाणीही छापेमारी करण्यात आली असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. कोणत्यातरी मोठ्या नेत्यावर हल्ला होण्याचा कट शिजत होता, असा एनआयएला संशय आहे. ही कारवाई गोपनीय ठेवण्यात आली होती, त्यामुळे या छापेमारीशी संबंधित फोटो किंवा व्हिडीओ अद्याप मिळालेले नाहीत. एनआयएने अब्हुल कयूम नावाच्या व्यक्तीलाही ताब्यात घेतले आहे.
NIA detains Salim Fruit following a raid at his residence in Mumbai. He is an associate of Dawood Ibrahim. Some important documents also seized.
Raids at several locations in Mumbai linked to gangster Dawood Ibrahim’s associates and a few hawala operators are underway by NIA. pic.twitter.com/v1pdEw1RJw
— ANI (@ANI) May 9, 2022
बोरिवली, सांताक्रूझ, बांद्रा, नागपाडा, भेंडी बाजार, गोरेगाव, परळ, मुंब्रा आणि कोल्हापूर अशा २० ठिकाणी छापे मारण्यात आले आहेत. याचवेळी काही स्मगलर्स, हवाला ऑपरेटर्स, रिएल इस्टेटचे व्यावसायिक यांच्यावरही कारवाई करण्यात येते आहे. अवैध वसुली, खंडणीच्या माध्यमातून मोठ्या रकमा उभ्या करणे आणि त्या रकमांचा वापर देशविरोधी कारवायांसाठी करणे,. या आरोपांखाली ही कारवाई करण्यात येते आहे.
सलीम फ्रूट हा छोटा शकीलचा मेव्हणा आहे. शकील त्याच्या साथीदारांच्या माध्यमातून खंडणीचे रॅकेट चालवतो. सलीम फ्रूटचे२००६ साली दुबईतून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले होते. २०१० सालापासून तो जेलमध्ये आहे. त्याला जेलमधूनच अटक करण्यात आली आहे. सलीम फ्रूटच्या व्यतिरिक्त दाऊदचा मेव्हणा सउद सुसूफ तुंगेकर, दाऊदचा छोटा भाऊ इक्बाल कासकरचा साथईदार खालिद उस्मान शेख आणि दाऊदची बहीण हसीना पारकरचा मुलगा अलीशान पारकर यांचेही जबाब या प्रकरणी नोंदवण्यात येण्य़ाची शक्यता आहे.
गृह मंत्रालयाच्या आदेशाने फेब्रुवारीत एनआयएने दाऊद इब्राहिम आणि डी कंपनीच्या बेकायदेशीर खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात ही छापेमारी करण्यात आली आहे. खंडणी वसुलीतून मिळणाऱ्या पैशांचा वापर देशविरोधी कारवायांत होत असल्याचा आरोप आहे. एनआयएने याप्रकरणात यूएपीएच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या सगळ्यांचे कनेक्शन १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी दहशतवादी दाऊद इब्राहिमशी असल्याचे सांगण्यात येते आहे.
दहशतवादाला होत असलेल्या फंडिंगचा उपयोग करत पुन्हा एकदा दाऊद मुंबईत अंडरवर्ल्डचे नेटवर्क उभे करण्याचा प्रयत्न करीत होता. राजकीय नेते, व्यापारी आणि इतर मान्यवर व्यक्तींवर हल्ले करुन मुंबईसह इतर शहरांतही दहशत पसरवण्याचा त्याचा कट होता. यासाठी त्याने एका विशेष गँगचीही स्थापना केली होती. त्यामुळेच या प्रकरणी एनआयएने सक्रिय होत कारवाई केल्याचे सांगण्यात येते आहे.
राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक हे दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्या जमीन खरेदी प्रकरणात अटकेत आहेत. त्यांना ईडीने अटक केली आहे. दहशतवादासाठी फंडिंगचा आरोप त्यांच्याविरोधात तपास यंत्रणा करीत आहेत. भाजपा नेते किरीट सोमय्या महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप करीत आहे, यात अनिल परब यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी कोणाकोणापर्यंत यंत्रणा पोहचणार, हे गूढ आहे.
१९९३ बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी दाऊदच्या विरोधात २५ दशलक्ष डॉलर्सचे इनाम आहे. त्याची डी कंपनी ही संयुक्त राष्ट्रसंघाने बंदी घातलेल्या दहशतवादी संघटांपैकी एक आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने २००३ साली दाऊदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे. दाऊद पाकिस्तानात लपल्याचे पुरावे असल्याचेही सांगण्यात येते आहे. १९९३ च्या स्फोटांनंतर तो पळून गेला आहे. दिल्ली पोलिसांनी त्याचा शेवटचा कॉल नोव्हेंबर २०१६ मध्ये रेकॉर्ड केला होता.