मुंबई : उत्तम प्रवासी सेवा देत प्रवाशांची पहिली पसंती कमावणारे रेल्वे प्रशासन आता आपल्या कामगिरीची नवी धमक देशाला दाखवून देणार आहे. रेल्वेची टीम (Railway Team) पहिल्यांदाच शिखर सर करणार असून एव्हरेस्ट शिखर (Mount Everest) वर 7135 मीटर चढाई करणार आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी यासंबंधित ‘माउंट नन पर्वतारोहण-2022’ मोहिमेला हिरवा झेंडा (Green Signal) दाखवला आहे. रेल्वे टीमने हाती घेतलेल्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वच क्षेत्रांतून कौतुक केले जात असून एव्हरेस्ट मोहीमच्या यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. रेल्वेच्या टीमने तरुणांना ट्रेकिंग आणि किल्ल्यांचे महत्व समजावे, याकरीता आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांवर मोहिमा आयोजित केल्या आहेत.
सेंट्रल रेल्वे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स क्लब (सीआरएएससी) ने ‘आझादी का अमृत महोत्सव’निमित्त हिमालयातील नन पर्वतावर चढाई करण्याची ही मोहीम आखली आहे. आज, शुक्रवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवत मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी मनोज शर्मा, मुख्य प्रशासकीय अधिकारी (निर्माण) अध्यक्ष सेंट्रल रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशन आणि टीम सेंट्रल रेल्वे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स क्लबचे (सीआरएएससी) पदाधिकारी उपस्थित होते. सेंट्रल रेल्वे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स क्लब (सीआरएएससी) चे पथक हेमंत जाधव, मुंबई विभागाच्या अभियांत्रिकी शाखेचे मुख्य कार्यालय अधीक्षक (नेतृत्वात) आणि संदीप मोकाशी, ठाकुर्ली येथील सेंट्रलाइज्ड इलेक्ट्रिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे कार्यालय अधीक्षक हे या एव्हरेस्ट मोहिमेत पुढाकार घेणार आहेत.
पुढील वर्षी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करण्याचे मध्य रेल्वेच्या टीमचे ध्येय आहे. ही मोहीम 8 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2022 या कालावधीत होणार आहे. लडाख प्रदेशातील सूर खोऱ्यात वसलेले माउंट नन हे अतिशय कठीण आणि थंड म्हणून ओळखले जाते. या शिखराची उंची समुद्रसपाटीपासून 23409 फूट (7135 मीटर) आहे. याला प्री-एव्हरेस्ट मोहीम म्हणून ओळखले जाते. याव्यतिरिक्त त्यांनी अनेक बचाव मोहिमा पार पाडल्या आहेत, ज्या मोहिमांमध्ये अनेकांचे जीव वाचवले आहेत. तसेच कुठल्याही आपत्तीमध्ये मदत करणे, सायकलिंग मोहिमेचे नियोजन करणे आणि लोकांना सायकलिंगचे महत्त्व पटवून देणे आदी कार्यांमध्येही रेल्वेच्या टीमचा सक्रिय सहभाग असतो. (Railways Mount Nun expedition, Will climb 7135 meters on Everest for the first time)