Raj Thackeray : टोलचा फैसला शिवतीर्थावर होणार?; राज ठाकरे यांच्या घरी महायुतीचे मंत्री; बैठक सुरू

| Updated on: Oct 13, 2023 | 9:28 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी टोल संदर्भात चर्चा केली. त्यानंतर आज राज ठाकरे यांच्या घरी टोलसंदर्भात बैठक सुरू आहे. या बैठकीला मंत्री दादा भुसे उपस्थित आहेत.

Raj Thackeray : टोलचा फैसला शिवतीर्थावर होणार?; राज ठाकरे यांच्या घरी महायुतीचे मंत्री; बैठक सुरू
raj thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे टोलनाक्यांच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. टोलनाके जाळून टाकण्याची भाषाच राज यांनी केली आहे. त्यानंतर राज ठाकर यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी शिंदे यांच्यासोबत टोलच्या मुद्द्यावर चर्चा केली. पण या भेटीत काही निर्णायक तोडगा निघाला नाही. त्यामुळे आज पुन्हा या मुद्द्यावर बैठक सुरू आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे. या बैठकीत राज यांच्या निवासस्थानीच टोलच्या मुद्द्यावर निर्णायक फैसला होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे आले असून त्यांच्याशी एक तासापासून चर्चा सुरू आहे. मात्र MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार अद्यापही बैठकीला आलेले नाहीत. सकाळी 8.30 वाजता ही बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत टोल नाके, वाढीव टोल, त्याच त्याच कंपन्यांना मिळणारं कंत्राट, रोडचा पैसा जातो कुठे? त्याचं काय होतं? हे टोलनाके कसे बंद करता येईल? दरवाढ कशी मागे घेता येईल आदी मुद्द्यांवर चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

आजच्या बैठकीत महत्त्वाचा तोडगा निघणार असल्याचंही सांगितलं जात आहे. तसेच या बैठकीनंतर राज ठाकरे पत्रकार परिषद घेऊन बैठकीतील तपशील, निर्णय आणि पुढील रणनीती यावर भाष्य करणार असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

काल काय झालं?

राज ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. यावेळी शिंदे यांना त्यांनी एक निवेदन दिलं. मुख्यमंत्री आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांशी टोल संदर्भात चर्चा झाली. पण निर्णय काही झाला नाही. राज ठाकरे यांनीही काल तेच सांगितलं होतं. निर्णयापर्यंत येण्यासाठी माझ्या घरी बैठक होत आहे. या बैठकीतील चर्चेनंतरच निर्णयाची माहिती देईल, असं राज ठाकरे यांनी काल स्पष्ट केलं होतं.

मुख्य मुद्दा काय?

राज्यात टोलनाके कशासाठी सुरू आहेत? हे टोलनाके बंद केले पाहिजेत. टोल दरवाढ रद्द झाली पाहिजे, ही मनसेची मुख्य मागणी आहे. वर्षानुवर्ष टोल आकारला जात असल्याने मनसेकडून आंदोलन होत आहे. तसेच युती सरकारने यापूर्वी अनेकदा टोलमुक्त महाराष्ट्र करण्याच्या घोषणा केल्या आहेत. त्या घोषणेची अंमलबजावणी झाली पाहिजे, असं राज यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच त्यांनी टोलनाके जाळून टाकण्याची भाषा केली होती.