राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु आहे. निवडणूक आयोगाकडून आता कधीही निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. युती आणि आघाड्यांची जागा वाटपावर चर्चा सुरु आहे. या सर्व घडामोडीमागे मनसे नेते राज ठाकरे यांनी मोठी घोषणा केली. त्यांनी स्वबळाचा नारा दिला. या निवडणुकीत ना युत्या, ना आघाड्या आहे. आपण स्वतंत्रपणे महाराष्ट्राला सामोरे जाणार आहोत. निकालानंतर मनसे हा सत्तेतील पक्ष असेल हे लक्षात ठेवा. ज्यांनी आशा अपेक्षा ठेवल्या आहेत. त्यांना उत्तम महाराष्ट्र घडवून दाखवू. जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवण्याची इच्छा आहे, असे मनसे नेते राज ठाकरे यांनी म्हटले.
राज्यात गुन्हे वाढले आहेत. लहान मुलींवर बलात्कार सुरू आहेत. राज्यात गेल्यावर्षी ९ हजाराच्यावर मुली पळवल्या. हा समृद्ध महाराष्ट्र? बाईबाबत एखादी गोष्ट घडली तर रांजाच्या पाटलांचा चौरंग करणारा आमचा शिवराय. तो धाक, भीती कुठे आहे. ही महिला आणि मुलींची परिस्थिती असेल तर शाळेत कसं जायचं.
आमच्या भगिनीने बदलापूरचं प्रकरण बाहेर काढलं नसतं तर कधीच कळलं नसतं. हे सुराज्य हे स्वराज्य. हे महाराष्ट्र राज्य. ज्या राज्याकडे बघून अनेक राज्यांनी उभारी घेतली. प्रत्येकाला वाटलं महाराष्ट्रासारखं प्रगत व्हायचं तो महाराष्ट्र असा अधोगतीला चाललाय. जे मनाला येईल ते सांगितलं जातंय. जे मनाला येईल तो शब्द दिला जातोय. तुमचं महाराष्ट्राकडे तुमचं लक्ष असलंच पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लोकांचं लक्ष असलं पाहिजे. जनतेची फसवणूक कशी होते ही गोष्ट महत्त्वाची आहे, असे राज यांनी सांगितले.
आम्हाला काय करायचं आहे. पुढच्या पिढीसाठी काय करायचं आहे. कसलाच विचार नाही. फक्त येऊन तुमच्यासमोर खोटं सांगायचं. सोशल मीडियाचं माध्यम वापरायचं. काहीवेळा चॅनलवालेही सहभागी झालेले. एक तर महाराष्ट्राची भाषा. प्रवक्ते येतात आणि काय बोलतात. घाणेरडं वाईट प्रत्येकाला बोलता येतं पण कुठे बोलता येतं याला काही तारतम्य आहे की नाही. विनोदाने कोणती गोष्ट मांडावी, कुठे मांडावी. हे काही कळतं की नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले.