Raj Thackeray exclusive Interview: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा जोरदार हल्ला केला. शरद पवार यांनी आपण जातीवादी असल्याचे एक उदाहरण तरी द्या, असे म्हणाले होते. राज ठाकरे यांनी उदाहरण दिले. राज ठाकरे म्हणाले, एक उदाहरण सांगतो. सोपे उदाहरण आहे. त्याचे फुटेज सर्वांकडे आहे. भुजबळांना पुण्यात पुणेरी पगडी घातली. पवारांनी ती काढली आणि ज्योतिराव फुल्यांची पगडी घातली. ज्योतिराव फुल्यांची पगडी घालण्याबाबत काही म्हणणे नाही. पण ही घालू नका, ही घाला. ते फुटेज पाहा. सत्काराच्या वेळी हे घडले होते, असे राज ठाकरे यांनी सांगितले. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी हे स्पष्टीकरण दिले.
राज ठाकरे यांनी महाराष्ट्रासाठी काहीच केले नाही. त्या शरद पवार यांच्या टीकेवर राज म्हणाले, शरद पवार यांना वयानुसार गोष्टी आठवत नसेल. मी ज्या अनेक गोष्टी केल्या त्याची पुस्तिका पाठवतो. माझ्याकडून एक गोष्ट नाही झाली. मी जातपात पाळली नाही. मी जातीवादी राजकारण केले नाही. मागच्या बाजूने पिल्ले सोडायची हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे. छोट्या मोठ्या संघटना उभ्या करायच्या त्यांना पैसे पुरवायचे या गोष्टी सर्वांना माहीत आहे. काही गोष्टी मला पर्सनली बोलायच्या नाही. नाही तर त्याही बोललो असतो. पण त्याचा राजकारणाशी संबंध नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
लाडकी बहीण योजना टिकली दर महिन्याला टिकवता आले तर मी त्याला गिफ्ट म्हणेल. टिकवता आली नाही तर त्याला लाच म्हणेल. मला इतर राजकारण्यांसारखे वागता येत नाही. तशी अपेक्षा करणार असाल तर ते होणार नाही. चांगल्याला चांगलं म्हणणं वाईटाला वाईट म्हणणार आहे. मला वाटतं प्रत्येकाने ही गोष्ट केली पाहिजे. याचा अर्थ भूमिका बदलत आहात असं होत नाही. स्वार्थासाठी केलं तर ती गोष्ट लागू होते. तुमचा स्वार्थ नसेल एखादी भूमिका पटली तर तुम्ही चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हटलं पाहिजे.