मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यात आता दोन नव्या कोऱ्या करकरीत कारचा समावेश झाला आहे. राज यांनी एक स्वत:साठी कार घेतली आहे. तर 15 दिवसांपूर्वी पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासाठीही कार घेतली आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी पांढऱ्या रंगाची कार घेतली आहे. पांढऱ्या रंगाला पसंती देण्याची राज यांची ही पहिलीच वेळ आहे. मात्र, कार घेताना एक गोष्ट त्यांनी कायम ठेवली आहे. ती म्हणजे लकी नंबर. राज यांनी कारला लकी नंबरचीच पसंती दिली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यात काल टोयोटा कंपनीची नवी गाडी लँड क्रूझर ‘शिवतीर्थ’वर दाखल झाली आहे. राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांचीही नवी गाडी टोयोटा वेल्फायर 15 दिवसांपूर्वी ‘शिवतीर्था’वर दाखल झाली आहे.
राज ठाकरेंच्या नव्या गाडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राज यांनी पहिल्यांदाच पांढऱ्या रंगाची कार खरेदी केली आहे. नव्या गाडीलाही त्यांनी 9 या लकी नंबरचीच पसंती दिली आहे.
राज ठाकरे यांच्याकडे यापूर्वी मर्सिडीजची सेडान कार आहे. ते नेहमी याच कारने प्रवास करताना दिसत असतात. स्वत: कार चालवण्याचा आनंदही लुटतात. देशातील अनेक नेते आणि सेलिब्रिटीजकडे हीच कार आहे.
राज ठाकरे यांचं तीन सी वर प्रचंड प्रेम आहे. एक म्हणजे सिनेमा, कार आणि कार्टुन. त्यांच्याकडे सेडान कारसह टोयोटाची जुन्या पिढीतील लँड क्रुझर एसयूव्ही कारही आहे. ही कार त्यांनी 2009मध्ये खरेदी केली होती. अनेक सेलिब्रिटींकडेपूर्वी हीच कार होती. या कारला सहजपणे बुलेटप्रुफ केलं जाऊ शकतं. या कारची ऑफरोडिंगही जबरदस्त आहे. त्यामुळे पूर्वी या कारला अधिक पसंती दिली जायची.
9 नंबर हा राज ठाकरे यांचा सर्वात लकी नंबर आहे. शिवसेनेत असतानाही आणि मनसेची स्थापना केल्यानंतरही त्यांचं 9 नंबरवरचं प्रेम कमी झालं नाही. एवढेच नव्हे तर मुलगा अमित ठाकरे यांच्या विवाह सोहळ्यातही त्यांनी 9 या लकी नंबरची पुरेपुर काळजी घेतली होती.
मनसेची स्थापना 9 मार्च 2006 रोजी झाली होती. त्यांनी पक्षाची स्थापनेसाठी 9 हा आकडाच निवडला होता.
त्यांच्या कारचा नंबरही 9 आहे. आता घेतलेल्या नव्या कारचा नंबरही 9 च आहे.
अमित ठाकरे यांचं लग्न 27 जानेवारीला झालं. म्हणजे 2 अधिक 7 मिळवल्यास 9 हा आकडा येतो. अमित यांच्या लग्नाचा मुहूर्तही 12 वाजून 51 मिनिटाला होता. म्हणजे या आकड्यांची फोड करून बेरीज केल्यास 9 आकडा येतो. तो असा 1+2+5+1 = 9