मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या मुद्द्यावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यस्थी केल्याने या वादावर तापलेलं राजकारण तात्पुरता स्वरुपात थंड झालं असलं तरी मुंबईतील राजकीय घडामोडी काही कमी होताना दिसत नाहीयत. मुंबईत महाविकास आघाडीकडून येत्या 17 डिसेंबरला महामोर्चा काढण्यात येणार आहे. या महामोर्चासाठी महाविकास आघाडीच्या गोटात प्रचंड वेगाने हालचाली होत आहेत. विशेष म्हणजे एकीकडे या हालचाली सुरु असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ आणि ‘सागर’ बंगला या शासकीय निवासस्थानी वेगवेगळ्या घडामोडी घडल्या आहेत. तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ बंगल्यावरही मविआची महत्त्वाची बैठक झालीय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी भेट घेतलीय. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महाराष्ट्रात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे. मुंबई महापालिकेचीदेखील निवडणूक जवळ आलीय. आगामी निवडणुकींमध्ये मनेसेने एकहाती निवडणूक लढण्याची घोषणा केलीय. असं असताना राज ठाकरे यांनी अचानक आज देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली असेल? अशा चर्चांना उधाण आलं.
दरम्यान, सूत्रांकडून राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमागचं नेमकं कारण समजलंय. कोकण महामार्गावर चर्चा करण्यासाठी राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आलीय.
एकीकडे मविआची बैठक तर दुसरीकडे ‘वर्षा’वर खलबतं
विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांची आज अजित पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. महामोर्चावर नियोजन करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. विशेष म्हणजे एकीकडे अजित पावर यांच्या निवासस्थानी बैठक सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी खलबतं सुरु होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षावर गेले होते. तेव्हा दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची शक्यता आहे.