मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज तोफ कुणावर धडाडणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. राज्यात आगामी काळात महत्त्वाच्या शहरांमध्ये महापालिका निवडणुकींचं बिगूल वाजण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये मुंबई महापालिकेचा देखील समावेश आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकणार असल्याची चर्चा आहे.
मुंबईत नेस्को सेंटरमध्ये आज राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्यात राज ठाकरे गटप्रमुखांना महत्त्वाच्या सूचना देणार आहेत.
या मेळाव्यात राज ठाकरे आगामी महापालिका निवडणुका तोंडावर ठेवून नव्या उपक्रमांबद्दल काय माहिती देतात? याकडे अनेकांचं लक्ष असणार आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या आजच्या भाषणात ते कुणावर निशाणा साधतात? हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. मुख्य म्हणजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलंय. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. त्यामुळे राज ठाकरे राज्यपाल आणि राहुल गांधी यांच्या विधानांवर काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.
दोन आठवड्यांपूर्वी ठाण्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. कारण ‘हर हर महादेव’ चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला असा ठपका ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थिएटरमध्ये घुसून शो बंद पाडला होता. त्यानंतर मनसेने तो शो पुन्हा सुरु केला होता.
या घडामोडींवरुन आव्हाडांना पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली होती. त्यांना अटक करण्यात आली होती. सबंधित प्रकरणावर राज ठाकरे काय भूमिका मांडतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल.