मराठी मुलीला घर नाकारलं, राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, तर गालावर…

| Updated on: Sep 29, 2023 | 12:07 PM

दोन दिवसांपूर्वी एका महिलेला मुलुंडला घर नाकारण्यात आलं आहे. केवळ मराठी असल्यामुळे त्यांना घर नाकारण्यात आलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

मराठी मुलीला घर नाकारलं, राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, तर गालावर...
raj thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई | 29 सप्टेंबर 2023 : मुलुंडमध्ये एका मराठी महिलेला घर नाकारण्यात आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या महिलेला केवळ ती मराठी असल्यामुळेच घर नाकारण्यात आलं असून त्यावरून राजकीय प्रतिक्रियाही उमटत आहेत. मनसेने जाब विचारताच सोसायटीने माफी मागितली असली तरी आता या मुद्द्याला राजकीय वलय प्राप्त झालं आहे. या मुद्द्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्विट करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांनी मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा असले प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचा सज्जड दमच दिला आहे.

मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वगैरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहीत नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिलीय.

सरकारने धाक दाखवावा

हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित. आणि सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

लाथ बसलीच पाहिजे

काल मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचं मनापासून अभिनंदन. तुमचं कायम लक्ष असतंच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झालं तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असंच सुरु राहिलं पाहिजे. अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आरोप-प्रत्यारोप

मराठी महिलेला घर नाकारण्यात आल्याच्या मुद्द्यावरून आता राजकीय वर्तुळात आरोपप्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या प्रकाराला थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जबाबदार धरले आहे. तर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या केम छो आणि लुंगी डान्समुळे हे प्रकार घडत असल्याचं म्हटलं आहे. तर, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांनी माझ्याबाबतही असाच प्रकार घडल्याची धक्कादायक माहिती दिली आहे.