मुंबई, दि. 23 फेब्रुवारी 2024 | शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज पहाटे तीन वाजता निधन झालं. त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोहर जोशी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. राज ठाकरे यांनी आपल्या श्रद्धांजली संदेशात मनोहर जोशी म्हणजे शिवसेनेच्या आक्रमक धाटणीत अजातशत्रुत्व असलेले व्यक्तीमत्व असल्याचे म्हटले.
बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून त्यांच्या सोबतच्या पहिल्या फळीतील मनोहर जोशी ज्येष्ठ नेते होते. शिवसेनेची धाटणीच आक्रमक, पण त्यात अजातशत्रुत्व जपत मनोहर जोशी सरांची राजकीय वाटचाल सुरु राहिली. शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं, जे मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झालं. पुढे ते लोकसभा अध्यक्ष झाले आणि नंतर शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे सैनिक म्हणून राहिले. १९६६ पासून शिवसेनेचा धगधगता इतिहास पाहिलेले आणि जगलेले एक शिवसैनिक, नेते आज काळाच्या पडद्याआड गेले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनोहर जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
मनोहर जोशी सरांचं निधन झालं. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून त्यांच्या सोबतच्या पहिल्या फळीतील ते ज्येष्ठ नेते. शिवसेनेची धाटणीच आक्रमक, पण त्यात अजातशत्रुत्व जपत सरांची राजकीय वाटचाल सुरु राहिली.
शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं जे मनोहर… pic.twitter.com/ti8v3tJWzl— Raj Thackeray (@RajThackeray) February 23, 2024
सर्वसामान्य परिस्थितीतून कष्टाने पुढे येत त्यांनी राजकारणात वेगळे स्थान निर्माण केले आणि देशाच्या राजकारणातही नावलौकिक मिळविला. प्रचंड गरिबीतून त्यांनी केलेला प्रवास, त्यासाठी उपसलेले कष्ट आणि त्यांना मिळालेले यश थक्क करणारे आहे. त्यांच्या निधनाने बाळासाहेबांचा एक कडवट शिवसैनिक काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो आणि मृतात्म्यास सद्गती लाभो, हीच प्रार्थना, असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी मनोहर जोशी यांची ओळख होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भुषवताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन राज्याच्या विकासासाठी परिश्रम घेतले. लोकसभेच्या अध्यक्षपदी असताना संसदेच्या प्रांगणात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात त्यांची प्रमुख भुमिका होती. मी जोशी कुटूंबीयांप्रती माझ्या सहसंवेदना व्यक्त करतो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
मनोहर जोशी यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक सुसंस्कृत, अनुभवी नेता गमावला आहे. जोशी सरांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो ही प्रार्थना, असे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.