मुंबई : 20 सप्टेंबर 2023 | शिवसेना सोडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत गेलेले माजी गृहराज्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्या विश्वासू नेत्याने आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. यापूर्वी ‘या’ नेत्याने चार वेळा आमदारकीची निवडणूक लढविली होती. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘या’ नेत्याने भुजबळ यांचा माझगाव विधानसभा मतदारसंघात पराभव केला होता. त्यामुळे ‘या’ नेत्याला ‘जायंट किलर’ म्हणून ओळखले जाते. हा नेता आता मनसेचा सरचिटणीस आहे.
राज ठाकरे यांनी शिवसेनेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून बाळा नांदगावकर हे त्यांच्यासोबत सावलीसारखे वावरत आहेत. मनसेने 2009 साली पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढविली. त्यावेळी मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. या आमदारांचे नेतृत्व बाळा नांदगावकर यांनी केले होते.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी 2014 साली दक्षिण मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढविली होती. मात्र, शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी त्यांचा पराभव केला. 2014 शिवडी विधानसभेतून त्यांनी निवडणूक लढवली. पण, इथेही शिवसेनेच्या अजय चौधरी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून मनसेतर्फे 2009 साली श्वेता परुळकर आणि 2014 साली आदित्य शिरोडकर यांनी निवडणूक लढवली होती. श्वेता परुळकर यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. तर, आदित्य शिरोडकर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत गेले. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी या मतदारसंघातून बाळा नांदगावकर यांचे नाव पुढे येत आहे.
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघामध्ये शिवसेनेचे (शिंदे गट) राहुल शेवाळे हे विद्यमान खासदार आहेत. राहुल शेवाळे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून दोनदा विजयी झाले आहेत. त्यांची या मतदार संघावर पकड आहे. मात्र, गणेशोत्सव निमित्त बाळा नांदगावकर यांची दक्षिण मध्य मुंबई मतदार संघातील दादर माहीमसह अन्य भागात भली मोठी पोस्टर्स झळकली आहेत. या पोस्टर्सच्या माध्यमातून त्यांनी गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे ही निवडणूक पूर्व तयारी असल्याची चर्चा सुरु झाली आहे.