मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्षांतर्गत गटबाजीवर प्रचंड संतापले आहेत. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून वारंवार मनसेमधील पक्षांतर्गत गटबाजीच्या बातम्या समोर येत आहेत. मनसे नेते वसंत मोरे यांनी अनेकदा या विषयावर प्रसार माध्यमं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून भूमिका मांडली आहे. पुण्यातील पदाधिकाऱ्यांकडून आपल्याला डावललं जात असल्याचा दावा त्यांनी केला होता. याशिवाय नुकतंच वसंत मोरेंनी फेसबुकच्या माध्यमातून पुण्यातील मनसे नेते आप्पा आखंडेंना पद देण्याची मागणी केली होती. या सगळ्या गटबाजीला अखेर राज ठाकरे हे देखील कंटाळले आहेत. त्यामुळे त्यांनी ट्विट करत आपल्या पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना उद्देशून संताप व्यक्त केलाय. तसेच पुन्हा असा प्रकार बघायला मिळाला तर पक्षातून हकालपट्टी अटळ असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत.
राज ठाकरेंनी एक पत्र जारी करत महाराष्ट्रभरातील तमाम महाराष्ट्र सैनिकांना सोशल मीडियावर पक्षातील गोष्टी सांगू नका अशी ताकीद दिली आहे.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
“सध्या माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाऊन वाट्टेल ते बोलायचं, प्रसिद्धी मिळवायची असं करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्याच पक्षात दिसून येत आहे”, असं राज ठाकरे म्हणाले.
“माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाचे लाईक्स ह्याच्याने हे सगळे शेफारले आहेत. इतर पक्षांनी अशा लोकांचं काय करावं हे त्यांनी ठरवावं, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत हे मी खूपवून घेणार नाही”, अशा इशारा राज ठाकरेंनी दिला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील प्रत्येकाने पक्षशिस्त पाळायलाच हवी ! pic.twitter.com/42cuKigAWk
— Raj Thackeray (@RajThackeray) December 21, 2022
“माझ्या पक्षातल्या कोणालाही, पक्षांतर्गत बाबींवर काही म्हणणं मांडायचं असेल तर संबंधित नेत्यांशी बोला, माझ्याशी बोला. पण हे सोडून जर थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल, तर आधी राजीनामा द्या, मग काय घाण करायची आहे ती करा”, असं राज ठाकरे म्हणाले.
“पक्षात राहून असे प्रकार केलेत, तर हकालपट्टी अटळ आहे हे लक्षात ठेवा. ही समज नाही तर अंतिम ताकीद आहे याची नोंद घ्या”, असं राज ठाकरे मनसैनिकांना उद्देशून म्हणाले आहेत.