Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उद्या शिवाजी पार्कात मेळावा होणार आहे. या मेळाव्यातून राज ठाकरे लोकसभा निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. राज ठाकरे महायुतीत जाणार की पाठींबा जाहीर करणार ? याबाबत ते घोषणा करणार आहेत. मनसे अध्यक्षांनी, महाराष्ट्र सैनिकांना गुढीपाडव्याला शिवतीर्थावर बोलावलं आहे. नेमकं काय घडलंय…काय घडतंय, हे आपल्याला सांगायचं असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत. मात्र दादरच्या शिवाजी पार्कातील भाषणाच्या एक दिवसआधीच फडणवीसांनी पत्ते उघड केले आहेत. राज ठाकरे मोदींना पाठिंबा देतील, अशी अपेक्षा असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.
गेल्याच महिन्यात 19 तारखेला राज ठाकरे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भेटले आणि इथूनच मनसे भाजपसोबत अर्थात महायुतीत जाणार अशा चर्चा सुरु झाल्या. 19 मार्चला अमित शाह-राज ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर 2 दिवसांनी म्हणजे 21 मार्चला मुंबईतल्या ताज लॅड्स हॉटेलमध्ये मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये दीड तास चर्चा झाली. भाजप नेत्यांसोबतच्या भेटीगाठींनंतर मनसेला लोकसभेच्या 2-3 जागा मिळतील अशा बातम्या समोर आल्या. ज्यात दक्षिण मुंबई, नाशिक जागेची चर्चा समोर आली. बाळा नांदगावकरांनीही भाजपसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं म्हटलं.
2014 मध्ये मनसेनं मोदींना उघड पाठिबा दिला होता. मात्र त्याचवेळी स्वत:चे उमेदवारही उभे केले होते. एकूण 9 उमेदवार राज ठाकरेंनी शिवसेनेच्याच विरोधात दिले होते.
2019 मध्ये मनसेनं लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. मात्र तरीही सभा घेत पंतप्रधान मोदींना उघड विरोध केला. अर्थात राज ठाकरेंचा प्रचार आघाडी सरकारच्या बाजूनं होता. आता 2024 मध्ये पुन्हा राज ठाकरेंची भाजपसोबतची जवळीक वाढलीय. नुकतीच राज ठाकरेंची अमित शाहांसोबत भेटही झाली. त्यामुळं महायुतीत जाण्याचा निर्णय राज ठाकरे जाहीर करणार की बाहेरुन पाठींबा देणार हे पुढच्या काही तासांत स्पष्ट होईल.
आतापर्यंत मनसेच्या मतांचा ट्रॅकरेकॉर्ड पाहिला तर, पक्ष स्थापनेनंतर मनसेनं पहिल्यांदा 2009 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली. एकूण 11 उमेदवार मनसेनं दिले होते. त्यावेळी मनसेनं महाराष्ट्रात 4.1% मतं घेतली होती.
2014 मध्ये मनसेनं 10 उमेदवार दिले आणि मतांची टक्केवारीही घसरली. मनसेनं 2014 मध्ये दीड टक्का मतं घेतली. 2019मध्ये मनसे लोकसभा लढलीच नाही
विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर 2009 मध्ये राज ठाकरेंनी 143 उमेदवार दिले…त्यापैकी पहिल्याच झटक्यात 13आमदार निवडून आणले. त्यावेळी मनसेला 5.71% मतं मिळाली.
2014 ला मनसेनं 219 उमेदवार उभे केले. पण अवघा आमदार निवडून आला. मनसेनं निवडणुकीत 3.15 टक्के मतं घेतली. 2019 मध्येही मनसेनं 101 उमेदवार दिले. पुन्हा एकच आमदार निवडून आला. विधानसभेला 2.25 टक्के मतं घेतली.
आता मनसेचं इंजिन भाजप आणि महायुतीच्या दिशेनं दिसतंय. गेल्या महिन्यात झालेल्या मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी लोकसभेवर आपली भूमिका गुढी पाडव्याला स्पष्ट करणार असल्याचं म्हटलं होतं.
लोकसभेच्या निवडणुकीत सर्वांचीच भूमिका क्लीअर झालीय. अगदी वंचितनंही स्वतंत्र उमेदवार दिलेत. आता मनसे काय करणार ? महायुतीला इंजिन जोडणार का ? याच उत्तर पुढच्या काही तासांत मिळेल.