राजू शेट्टी अचानक ‘मातोश्री’वर, उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा; महाविकास आघाडीत येणार?

| Updated on: Jan 02, 2024 | 4:14 PM

लोकसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज मातोश्रीवर जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा ते पाऊण तास चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. राजकीय परिस्थितीसह धारावी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या दोघांच्या बैठकीत चर्चा झाल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे या भेटीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

राजू शेट्टी अचानक मातोश्रीवर, उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा; महाविकास आघाडीत येणार?
uddhav thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

दिनेश दुखंडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 2 जानेवारी 2024 : लोकसभा निवडणुकीला अवघे तीन महिने उरले आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीची आपआपल्या मित्र पक्षासोबत जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी या सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडीचंही जागा वाटप अंतिम टप्प्यात आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आघाडीकडून प्रत्येकी एक जागा दिली जाणार असल्याची चर्चा आहे. ही चर्चा सुरू असतानाच आज माजी खासदार राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली. राजू शेट्टी हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी पक्षाकडून उभे राहणार असल्याची माहिती आहे. पण राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीकडून उभं राहावं असा आघाडीचा प्रयत्न आहे. खासकरून ठाकरे गटाचा तसा प्रयत्न आहे. त्यावर उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांच्यात चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.

तर इंडिया आघाडीत येणार

राजू शेट्टी यांना हातकणंगलेमधून उमेदवारी देण्याचा उद्धव ठाकरे गटाचा आग्रह आहे. सध्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटात असलेले खासदार धैर्यशील माने हे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाच्या आग्रहाखातर राजू शेट्टी यांना ही जागा मिळू शकते. पण राजू शेट्टी हे एकाच जागेवर समाधानी होती की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. राजू शेट्टी एकाच जागा घेण्यास तयार झाले तर त्यांचा इंडिया आघाडीत येण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

भेटीचं कारण काय?

उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर राजू शेट्टी यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भेटीचं कारण सांगितलं. उद्धव ठाकरेंना मी राजकीय हेतूने भेटलो नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी भेटलो होतो. त्यांची अदानी उद्योग समूहाविरोधात लढाई सुरू आहे. अदानीचा शेतकऱ्यांनाही त्रास होत आहे. केंद्राने अदानींवरील प्रेमापोटी आयात होणाऱ्या खाद्य तेलावरील पाच टक्के आयात शुल्क कमी केल्यामुळेसोयाबीनला भाव नाही. 2000 मध्ये सोयाबीनचा भाव 4 हजार रुपये होता. 24 वर्षानंतर आहे तेवढाच आहे. याचं कारण मोठ्या प्रमाणात कच्च तेल बाहेरच्या देशातून आयात झालं. त्यावरील आयात शुल्क 2005पर्यंत 5 टक्क्याने कमी केल्याचे हे परिणाम आहेत, असं राजू शेट्टी यांनी सांगितलं.

येत्या 15 जानेवारीपासून मी सोयाबीनच्या प्रश्नावर आणि कर्जमाफीच्या प्रश्नावर मराठवाड्यात दौरा करणार आहे. त्यासाठी ही अदानी विरुद्धची उद्धव ठाकरे यांची लढाई आहे, ती शेतकऱ्यांचीही आहे. कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्या अडीच टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याचबरोबर आमच्या कोल्हापुरात वेदगंगा नदीवर जे पाटगावचं धरण आहे. त्या धरणाचं पाणी अदानी उद्योग समूह 8 हजार 400 कोटी खर्च करून सिंधुदुर्गाला देऊन तिथे 2100 मेगावॅटची वीज निर्मिती करणार आहे. त्यामुळे कोल्हापूर सीमाभागातील कर्नाटकातील जनतेला शेतीला पाणी कमी पडणार आहे. त्याविरोधातही आम्ही आंदोलन सुरू करत आहोत. त्यासाठी एक संघर्ष समिती आम्ही स्थापन केली आहे. सिंधुदुर्गातील लोकांची साथ हवी आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या जनतेने एकत्र लढा दिला तरच हे पाणी वाचणार आहे, असंही ते म्हणाले.

इचलकरंजीसारख्या शहराला पाणी देऊ नये म्हणून लढे उभे राहत आहे. इथे राजरोजपणे तयार धरणातील पाणी अदानी समुहाला दिले जात आहे. जवळपास सात ते आठ टीएमसी पाणी समुद्राकडे वळवण्याचं कारस्थान सुरू आहे. या शेतकऱ्यांच्या लढ्याला शिवसेनेचा पाठिंबा मिळावा यासाठी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आमच्या लढ्याला पाठिंबा देत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं, अशी माहिती त्यांनी दिली.