मुंबई, दि. 15 फेब्रुवारी 2024 | राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महायुतीचे घटकपक्ष भाजपने तीन, शिवसेना (शिंदे गट) एक आणि राष्ट्रवादी (अजितदादा गट) एक असे पाच उमेदवार जाहीर केले आहेत. तर महाविकास आघाडीतून काँग्रेसकडून एक उमेदवार जाहीर केला आहे. निवडणूक झाली तर २७ फेब्रुवारी रोजी मतदान आणि २९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. भाजपने अशोक चव्हाण, मेधा गाडगीळ आणि डॉ.अजित गोपचडे यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेकडून (शिंदे गट) मिलिंद देवरा यांना संधी दिली आहे. राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल तर काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे. धक्कादायक म्हणजे प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभा खासदारकीचे तीन वर्ष बाकी आहे. त्यानंतर त्यांना उमेदवारी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याची मागणी होत होती. तसेच नुकतेच राष्ट्रवादीत दाखल झालेले बाबा सिद्दिकी यांचे नाव आले होते. पार्थ पवार यांच्यासाठी तरुण कार्यकर्ते तसेच पदाधिकारी आक्रमक होते. त्यांनी पार्थ पवार यांना उमेदवारी न दिल्यास बंड पुकारण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिली. प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभा खासदारकी २०२७ पर्यंत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर राज्यसभेत प्रफुल्ल पटेल एकमेव खासदार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेमधील बंडखोरीनंतर शरद पवार गटाने प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. त्यांनी पटेल यांची राज्यसभा खासदारकी रद्द करण्याची मागणी राज्यसभा सभापतींकडे केली आहे. त्याचा निकाल आल्यास आणि पटेल यांचे सदस्यत्व रद्द झाल्यास पटेल यांची खासदारकी रद्द होणार आहे. यामुळे प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्याची खेळी अजित पवार यांनी घेतली. तांत्रिक कारणामुळे पटेल यांना उमेदवारी दिल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी कार्यालयात राज्यसभेच्या उमेदवारीसाठी बैठक झाली. या बैठकीत तांत्रिक बाबींचा विचार करून प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पटेल खासदारकीचा राजीनामा आज देणार आहे. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता प्रफुल्ल पटेल उमेदवारी अर्ज भरणार आहे.