मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajyasabha Election) मनसे (MNS) कोणाला मतदान करणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच बुधवारी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. यावर मनसे आमदार राजू पाटील यांना विचारले असता त्यांनी शर्मिला वहिनींचा वाढदिवस होता म्हणून त्यांना शुभेच्छा द्यायला गेलो होतो, त्यावेळेला आशिष शेलार जे राज साहेबांचे मित्र आहेत तेही त्या ठिकाणी आले होते, त्यांनी साहेबांना विनंती केली तुम्ही आम्हाला पाठिंबा द्याल का म्हणून राज साहेबांनी त्यांना सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी विनंती केली म्हणून त्यांना मान दिला. बाकी कोणी विनंतीच केली नाही, मागच्या वेळेस संभाजीराजांनी विनंती केली त्यांच्या नोमिनेशन फॉर्मवर सही केली, असे म्हणताना राजू पाटलांनी शिवसेनेलाही नाव न घेता टोला लगावला आहे.
यावर बोलताना ते म्हणाले, काही लोक बाजुला ठेवून राज साहेबांना विचारले असते तर साहेबांनी तोही विचार केला असता, मात्र ते लोक एमआयएम आणि अबु आझमीच्या मागे बिझी असल्याने त्यांनी संपर्क केला नसेल, असा टोला त्यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीला लगावला आहे. तसेच भाजपच्या नेत्यांनी फोन केला, मात्र उद्या पाहू, मतदानाला जायच्या अगोदर राज साहेब फोन करणार आहेत, तेव्हा ते आदेश देतील तसे करून असेही राजू पाटील म्हणाले आहेत.
मनसे आणि शिवसेनेतलं राजकीय वैर काही आजचं नाही, राज ठाकरे हे शिवसेना सोडून बाहेर पडल्यापासून हे वैर सुरूच आहे. पहिल्यांदा सेना आणि भाजपची युती तुटल्यावरही मनसे भाजपच्या युतीच्या चर्चे होत्या, मात्र उद्धव ठाकरेंनी योग्य प्रतिसाद दिला नाही, असे राज ठाकरे उघडपणे सांगताना दिसून आले. मात्र त्यानंतर हे राजकीय वैर दिवसेंदिवस वाढतच गेलं. तसेच आता मागील काही दिवसांतलं राजकीय वातावरण आणि मनसेने हिंदूत्व आणि सत्तास्थापनेवरून शिवसेनेवर उडवलेली टिकेची झोड, तेसच भाजपच्या नेत्यांचं कौतुक पाहता आता मुख्यमंत्री पाठिंब्यासाठी विचारलं असतं तर राज ठाकरेंनी पाठिंबा दिला असा की नाही? याबाबत शंकाच आहे. आता सहाजिकच मनसेचं मत हे भाजपच्या पारड्यात पडणार आहे. मात्र एक मत हे कधी कधी संपूर्ण निवडणुकीचं चित्र बदलतं. त्यामुळे मनसेच्या एका मातचं वजनही या निवडणुकीत कळेलच.