मुंबई : एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांचं बंड झाल्यापासून रामदास कदम (Ramdas Kadam) हे सतत ठाकरेंवर प्रहार करत आहेत. आता तर त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतो तेव्हा त्यांच्या नातेवाईकांकडे जाऊन विचारत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतो तेव्हा त्यांच्या नातेवाईकांकडे जाऊन विचारत नाही, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे राष्ट्रीय महापुरुष आहेत, कोणाच्या घरीचा मालमत्ता नाही, अशी सडकून टीका उद्धव ठाकरेंवर केलीय. कामकाज सल्लागार समितीत कोणाला घ्यायचे हे प्रत्येक पक्ष ठरवतो, विधीमंडळात शिवसेनेचे एका बाजूला 51 आमदार आहेत आणि उद्धव ठाकरे गटाकडे फक्त 14-15 आमदार आहेत, त्यामुळे जिथे 51 आमदार आहेत तिथे त्यांचे नाव येईल, असे म्हणत कालच्या सदस्य निवडीव त्यांनी भाष्य केलंय. तसेच महाविकास आघाडीत असून नाराजी व्यक्त करणाऱ्या काँग्रेसलाही टोलेबाजी केलीय.
अजितदादा राष्ट्रवादीचे आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीत एकत्र येऊन विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याबाबत निर्णय व्हायला हवा होता ना? शिवसेना, राष्ट्रवादी आपल्याला गोवतात असे काँग्रेसला वाटत असेल तर त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, एवढी लाचारी का? असा सवालही त्यांनी केलाय.
तसेच चिन्हाचा निर्णय हा निवडणूक आयोगाचा निर्णय असतो, विधी मंडळात ज्याचे बहुमत असते त्यालाच चिन्ह मिळते, असेही त्यांनी पुन्हा बजावलं आहे. तर पुण्यात कोणाला पालकमंत्री बनवायचे हे महत्त्वाचे नाही, मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांना गडचिरोलीचे पालकमंत्री करावे, तेथील जनतेला न्याय द्यावा, असेही ते म्हणालेत.
तर शिवबंधन मलाही बांधले गेले आणि त्यामागची भूमिका शिवसेना सोडायची नाही अशी होती, मात्र शिवबंधन बांधून मला आयुष्यभरासाठी राजकारणातून संपवण्याच्या प्रयत्न झाला. शिवबंधन बांधा आणि घरी बसा असा संदेश मला देण्यात आला. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी मला शिंदे गेट समोर जावे लागले. गद्दार कोण, महाराष्ट्राची जनता सांगेल, रामदास कदम यांनी आयुष्यात कधीही विश्वासघात केला नाही, कधीही बेईमानी केली नाही, कधीही हरामखोरी केली नाही, माझ्या मुलाला राजकारणातून दूर करण्याचा प्रयत्न झाला, रामदास कदम शिंदे यांच्यासोबत मंत्री होण्यासाठी गेले नाहीत, विधान परिषदेचे सदस्यही झाले नाहीत, मला दोन मुलगे आहेत, एकनाथ शिंदे जी आहेत आणि माझे मित्र देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांच्या पाठीशी खांबाप्रमाणे उभा राहण्यासाठी मी शिंदे गटात गेलो आहे, मात्र मीडिया मध्ये मंत्रिमंडळात माझ्या नावाची चर्चा होत असेल, असेही कदमांनी स्पष्ट केलंय.