मुंबई | 13 फेब्रुवारी 2024 : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. “मी आपल्याला इथे एक गोष्ट स्पष्ट करु इच्छितो, अशोक चव्हाण यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसमधून कुणीही भाजपात जाणार नाही. काँग्रेस एकजुटीने महाराष्ट्रात काम करणार आहे. जे लोकं काँग्रेस सोडून जात आहेत त्यांच्यासोबत कुणीच उभं राहणार नाही. त्यांच्यासोबत महाराष्ट्राची जनतादेखील उभी राहणार नाही. कार्यकर्ताही सोबत राहणार नाही. अशोक चव्हाण परवा दुपारी तीन वाजेपर्यंतच्या बैठकीत आमच्यासोबत होते. त्यांनी कोणतीच गोष्ट आम्हाला सांगितलं नाही. ते दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटले होते. तसेच दिल्लीतील आमच्या काही नेत्यांना भेटले होते. तिथून ते परत आले. इथे आमच्यासोबत बैठकीत बसले होते. त्यांनी काँग्रेस पक्ष का सोडला? याचं त्यांच्याकडे काहीच उत्तर नाही”, असं रमेश चेन्नीथला म्हणाले.
“काँग्रेसची नीती चुकीची आहे का, काँग्रेसने त्यांच्यावर अन्याय केला आहे का, हे त्यांनी स्पष्ट करायला हवं होतं. काँग्रेस पक्षाने त्यांना काय दिलं नाही? त्यांना दोनवेळा मुख्यमंत्री बनवलं. ते 15 वर्ष मंत्री राहीले. काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बनले. तसेच ते प्रदेशाध्यक्ष देखील राहीले आहेत. मी युवक काँग्रेसचे अध्यक्ष होतो. माणिकरावर ठाकरे इथे अध्यक्ष होते. मी त्यांना युवक काँग्रेसचा महाराष्ट्र अध्यक्ष बनवलं होतं. काँग्रेसने सर्व काही दिलं. नेता बनवलं. पण तरीही ते पक्ष सोडून जात आहेत”, असा खेद रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.
“मी एक गोष्ट सांगू इच्छितो, अशाप्रकारे पक्ष सोडून जे लोकं जात आहेत त्यांना जनता मान्य करणार नाही. आम्ही राजकारणात विचारधारेच्या आधारावर काम करणारी माणसं आहोत. पक्ष बदलणं आणि आयाराम गयाराम होणं याला राजकारणात महत्त्व नाही. त्यांनी सांगितलं पाहिजे की, त्यांच्यावर ईडीचा, सीबीआयचा दबाव आहे का? त्यांच्यावर काँग्रेसने काय अत्याचार केले? त्यांना दोन महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचं सदस्य केलं. त्यांनी काहीच कारण सांगितलं नाही. आम्ही सर्व एकजुटीने काम करु”, असं चेन्नीथला म्हणाले.
“ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप आहेत, त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी भाजपने दरवाजा उघडा ठेवला आहे. अजित पवारांवर 70 हजार कोटींचा आरोप लावला. पक्ष बदलला ते पूर्ण स्वच्छ झाले. भाजप वॉशिंग मशिन आहे का? या देशात ज्यांच्यावर आरोप केले आहेत त्यांना आपल्या पक्षात घेत आहेत. मग त्यांच्यावरील आरोप खोटे ठरतात”, अशी टीका रमेश चेन्नीथला यांनी केली.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात राज्यसभा, लोकसभेत अशोक चव्हाण यांच्यावर आरोप लावले, आदर्श घोटाळ्याबाबत आरोप केले. पण त्यांनी पक्षांतर केलं आता ते स्वच्छ झाले. भाजप वॉशिंग मशिन आहे? नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना जे भेटतात ते स्वच्छ होऊन जातात. घोटाळा संपून जातो”, असं रमेश चेन्नीथला म्हणाले.