मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. त्यांच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आज त्यांचा जबाब नोंदवला. पोलिसांच्या चौकशीनंतर रणजीत सावरकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पोलीस राहुल गांधी यांच्याविरोधात लवकरच गुन्हा दाखल करतील, असा दावा केला.
“मी इथे राहतो म्हणून मी इथल्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मला कलम सांगता येणार नाही. पण महापुरुषांचं चरित्र हनन आणि बदनामी या मुद्द्यांवरुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. बदनामी प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं नाव आहे”, अशी प्रतिक्रिया रणजीत सावरकर यांनी दिली.
“काही दिवसांपूर्वी जे झालं होतं त्याबद्दल भोईवाडी पोलीस ठाण्यात राहुल गांधींविरोधात केस प्रलंबित आहे. कोर्टाने पोलिसांना तपासाचा आदेश दिला आहे. दिल्ली पोलिसांकडे तो आदेश गेलेला आहे”, अशी माहिती रणजीत सावरकर यांनी दिली.
“कायदेशीर प्रक्रिया पार पाडावीच लागेल. लवकरच गुन्हा दाखल होईल. पोलिसांनी आज माझा जबाब नोंदवून घेतलाय. तसेच कुणाबद्दलच आक्षेपार्ह आणि खोटे आरोप करु नये असं माझं स्पष्ट मत आहे”, अशी भूमिका त्यांनी मांडली.
“मी 17 नोव्हेंबरला तक्रार केली होती. त्यानंतर त्यांनी आज मला बोलावलं. त्यांनी माझा जबाब नोंदवला आहे. त्यानंतर आपण पुढची कारवाई करु इशी माहिती पोलिसांनी दिलीय”, अशी प्रतिक्रिया रणजीत सावरकर यांनी दिली.