मुंबई: बाबरी मशीद पडली तेव्हा मी अयोध्येतच होतो. तिथे असंख्य भाजपचे (BJP) कार्यकर्ते होते. पण शिवसैनिक कुठे दिसले नाहीत, असा दावा भाजपचे नेते रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांनी केला आहे. रावसाहेब दानवे यांच्या या दाव्यातील हवाच शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी काढून घेतली आहे. बाबरी पडली तेव्हा रावसाहेब दानवे अयोध्येला गेले नव्हते. दानवे तेव्हा माझ्यासोबत सिल्लोडला होते, असा दावा अब्दुल सत्तार यांनी केला आहे. त्यामुळे दानवे खरं बोलतात की सत्तार याची जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच सत्तार यांच्या या दाव्यावर दानवे काय उत्तर देतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावेळी सत्तार यांनी आघाडी सरकार स्थिर असल्याचा दावाही केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे समुद्राप्रमाणे स्थिर आहेत. त्यांची बदनामी कोणी करू नये. मुख्यमंत्र्यांनी जर आदेश दिले बदनामी करणाऱ्यांचा बंदोबस्त करू.मुख्यमंत्री यांनी आदेश दिले तर शिवसैनिक मैदानात उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला.
अब्दुल सत्तार यांनी यावेळी राणा दाम्पत्यांवरही हल्लाबोल केला. त्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभं राहण्याची लायकी नाही. त्यांची किंमत चार आण्याचीही नाही. त्यांना पळता भूई कमी पडेल, असा इशारा सत्तार यांनी दिला. राज्यात सध्या हनुमान चालीसा आणि औरंगजेबाची कबर हा विषय चांगलाच गाजतोय, अशातच महाविकास आघाडीतील नेते आणि शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी विरोधकांवर जोरदार वार करत भाजप राणा दांपत्य आणि अकबरुद्दीन ओवेसी यांचा समाचार घेत थेट भाजपला यावेळी आव्हाने दिलंय.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपण बाबरी मशीद पाडायला गेलो होतो. त्यावेळी शिवसैनिक तिथे नव्हते. मी वयाच्या 20व्या वर्षी नगरसेवक झालो. त्यानंतर बाबरी आंदोलनात सहभागी झालो होतो, असा दावा केला होता. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांची खिल्ली उडवली होती. तुमचं वय काय, तुम्ही बोलता काय. बाबरी पडली तेव्हा तुमचे वय काय होते? काय शाळेची सहल होती का? तुमच्या वजनानेच बाबरी पडली असती. कुणाला तिकडे जाण्याची गरजही पडली नसती, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. तर, रावसाहेब दानवे यांनीही शिवसेनेला डिवचले होते. मी स्वत: बाबरी आंदोलनात होतो. बाबरी पडली तेव्हा मी तिथेच होतो. शिवसेनेचा एकही कार्यकर्ता तिथे नव्हता, असं दानवे म्हणाले होते.