निखिल चव्हाण, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी थेट भाजपच्या दुखऱ्या नसवर बोट ठेवलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सावरकरांचं हिंदुत्व मान्य नव्हतं, असा दावाच संजय राऊत यांनी केला आहे. भाजप आणि शिंदे गटाने स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा सुरू केली आहे. त्याचवेळी संजय राऊत यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजप आणि संघाची पोलखोल केली आहे. संघावर आरोप करताना सावरकर कसे पुरोगामी होते. तसेच सावरकर विज्ञाननिष्ठ कसे होते आणि संघाला त्यांच्या विचाराशी कसे काहीच घेणंदेणं नाही, याकडेही राऊत यांनी लक्ष वेधले. ते मीडियाशी संवाद साधत होते.
सावरकर आणि संघाचे विचार भिन्न आहेत. दोघांचे विचार वेगवेगळे आहेत. संघ आणि सावरकरांच्या विचारात मेळ नाही. संघ सावरकरांचे हिंदुत्व मानत नाही. मग सावरकरांचे विचार कसे नेणार? आम्ही सावरकरांचं हिंदु्त्व स्वीकारलं. सावरकरांना शेंडी जानव्याचं हिंदुत्व मान्य नव्हतं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही शेंडी जानव्याचं हिंदुत्व मान्य नव्हतं. बाळासाहेबांनीच सावरकरांचे विचार पुढे नेले, असं सांगतानाच सावरकर यात्रा ही राजकीय अजेंड्यासाठीच काढली जात आहे. संभाजीनगरमधील दंगल हा राजकीय अजेंडाच होता, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
सावरकरांनी हिंदुत्वाचा विचार देताना पुरोगामी आणि विज्ञानवाद स्वीकारला. भाजप म्हणते, गाय ही गोमाता आहे. तर सावरकरांना ते मान्य नाही. गाय ही उपयुक्त पशू आहे. जर गाय दूध देण्याची थांबली तर गायीचं गोमांस खायला हरकत नाही,हा सावरकरांचा विचार होता. हा विचार भाजपला मान्य आहे का?, असा थेट सवालही त्यांनी केला.
आज संभाजीनगर जिल्ह्यात महाविकास आघाडीची सभा होत आहे. महाविकास आघाडीची ही पहिलीच संयुक्त सभा आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. आजच्या सभेला उद्धव ठाकरे पोहोचतील. संभाजीनगरातील महत्त्वाचे नेते असतील. मराठवाड्यातील शिवसेनेचे महत्त्वाचे नेतेही सभेला येतील. ही महाविकास आघाडीची सभा आहे. उगाच व्यासपीठावर गर्दी नको. लोकं प्रमुख लोकांची भाषणे ऐकायला येणार आहे. आजच्या सभेला प्रचंड गर्दी होईल अशी शक्यता आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
संभाजीनगरमधील आजची सभा अत्यंत महत्त्वाची आहे. या सभेला मोठी गर्दी होणार आहे. ही सभा शांततेत पार पडणार आहे. या सभेला महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र, संजय राऊत आजच्या महाविकास आघाडीच्या सभेत उपस्थित राहणार नाहीत. एका महत्त्वाच्या कामानिमित्त राऊत दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे ते सभेला हजर राहणार नाहीत.