Ratan Tata Death : ‘सगळी प्रॉपर्टी बॉम्बने उडवा, पण…’, ताज हॉटेलवरील हल्ल्यानंतर काय बोललेले रतन टाटा?

| Updated on: Oct 10, 2024 | 12:51 PM

Ratan Tata Death : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने सगळा देश शोकसागरात बुडाला आहे. रतन टाटा यांच्या जाण्याने फक्त उद्योग विश्वाचीच नाही, तर देशाची न भरुन येणारी हानी झाली आहे. मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांनी ताज हॉटेलला टार्गेट केलं होतं. त्यावेळी रतन टाटा तिथे पोहोचलेले. त्यावेळी रतन टाटांचा सुरक्षा रक्षकांसोबत काय संवाद झालेला?

Ratan Tata Death : सगळी प्रॉपर्टी बॉम्बने उडवा, पण..., ताज हॉटेलवरील हल्ल्यानंतर काय बोललेले रतन टाटा?
Ratan Tata
Follow us on

देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात बुधवारी निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. रतन टाटा पुढची अनेक वर्ष त्यांचा साधेपणा, विचारांसाठी भारतीयांच्या स्मरणात राहतील. रतन टाटा हे उत्तम व्यक्तीमत्वाचे चांगले माणूस होते. मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी प्रसिद्ध ताज हॉटेलला टार्गेट केलं होतं. त्या दिवशी जे घडलं, त्याचा उल्लेख रतन टाटा यांनी त्यांच्या एका मुलाखतीत केला. “कोणीतरी मला फोन करुन सांगितलं की, हॉटेलमध्ये गोळीबार सुरु आहे. त्यानंतर मी माहिती घेण्यासाठी ताजच्या स्टाफला फोन केला. पण त्यांनी माझा फोन उचलला नाही. मी माझी कार काढली आणि ताजला पोहोचलो. पण वॉचमनने मला थांबवलं. कारण तिथे गोळीबार सुरु होता” असं रतन टाटा मुलाखतीत म्हणाले.

या दरम्यान रतन टाटा तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांना म्हणाले की, “गरज पडली, तर माझी पूर्ण प्रॉपर्टी बॉम्बने उडवा. मला त्याची फिकीर नाही. पण एकही दहशतवादी जिवंत सुटता कामा नये” त्यावेळी ताज हॉटेलमध्ये 300 पाहुणे उपस्थित होते, असं रतन टाटा म्हणाले. रेस्टॉरंट भरलेली होती. तिथे उपस्थित असलेल्या स्टाफने सर्वांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात काही लोकांचा मृत्यू झाला. तीन दिवस हा हल्ला सुरु होता. त्या तीन रात्री रतन टाटा हे ताज हॉटेलच्या व्यवस्थापनासोबत उभे होते. त्यांना आधार दिला.

‘ताज हॉटेल भव्य-दिव्य आहे, पण….’

रतन टाटा हे ताजच्या मॅनेजमेंट आणि सहकाऱ्यांसोबत उभे राहिले. त्यांना आधार दिला. ताज हॉटेल भव्य-दिव्य आहे. पण ताजला आज जी प्रतिष्ठा मिळाली, त्यामागे कर्मचाऱ्यांची मेहनत आहे, हे रतन टाटा नेहमी म्हणायचे. रतन टाटा आज आपल्यात हयात नाहीत. पण त्यांनी जे विचार, तत्व दिली ती कायम सोबत राहतील.