मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या कन्येचा आज साखरपुडा होणार आहे. या सोहळ्याला राजकारण्यांची मांदियाळी जमणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी राऊत यांची कन्या पूर्वशी यांचा विवाह होणार आहे. राऊत यांचे व्याही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे अत्यंत अभ्यासू, मितभाषी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी समजले जातात. राऊत हे राजकारणातील पॉवरफूल राजकारणी असले तरी त्यांचे व्याही नार्वेकरही धडाडीचे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. जाणून घेऊया कोण आहेत राजेश नार्वेकर? (raut-narvekar family relation, who is rajesh narvekar?)
मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून काम पाहिले
राजेश नार्वेकर हे ठाण्याचे जिल्हाधिकारी आहेत. त्यांनी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काम केले आहे. ते रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. ग्रामीण भागात त्यांनी स्वच्छ भारत आणि पंतप्रधान आवास योजना प्रभावीपणे राबवल्या. तसेच त्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाच्या कालखंडात रायगड जिल्हा हगणदारीमुक्त झाला. त्यानंतर त्यांनी 2018मध्ये मुख्यमंत्र्यांचे सहसचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर त्यांची बदली ठाण्याच्या जिल्हाधिकारीपदी झाली.
कोरोना काळात उत्तम कामगिरी
राजेश नार्वेकर यांनी कोरोना काळात ठाण्यात अत्यंत चांगलं काम केलं. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्यांनी कठोर उपाययोजना अवलंबल्या होत्या. मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपालन व्हावं म्हणून त्यांनी यंत्रणा कामाला लावली होती. तसेच लॉकडाऊन काटेकोर पाळला जावा म्हणून जमावबंदी सारखे आदेशही त्यांनी काढले होते. तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवरही त्यांनी जरब बसवली होती. त्याशिवाय आरोग्य यंत्रणाही त्यांनी सुसज्ज ठेवल्या होत्या. रोज बैठका घेणं, अधिकाऱ्यांशी संवाद साधणा, रुग्णालयांना भेटी देणं आदी गोष्टींवर त्यांनी भर दिला होता. त्यांच्या कामांची अनेकांनी स्तुतीही केली होती.
मल्हार आयटी इंजीनियर
नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार हे आयटी इंजीनियर आहेत. तसेच त्यांचा स्वतंत्र व्यवसाय असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर, पूर्वशी राऊत या उच्चशिक्षित असून ‘ठाकरे’ चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. सायन इथे त्यांचं ऑफिस आहे.
साखरपुडा कुठे?
संजय राऊत यांची कन्या पूर्वशीच आज सायंकाळी 7 वाजता ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये साखरपुडा होणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशी यांचा साखरपुडा होणार आहे. राऊत यांच्या घरातील हे पहिलंच मंगलकार्य आहे.
पवार, ठाकरे, फडणवीस एकत्र
राऊत यांच्या घरी होणाऱ्या या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना साखरपुड्याचे आमंत्रण देण्यात आलं आहे. या सोहळ्यानिमित्ताने हे सर्व दिग्गज नेते एकत्र येणार आहेत. त्यामुळे या दिग्गजांच्या उपस्थितीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सोहळ्याला रश्मी ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. या शिवाय मराठी आणि सिनेसृष्टीतील काही कलाकारही उपस्थित राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
निमंत्रण पत्रिकेवर ‘पीएम’
संजय राऊत यांनी कन्येच्या साखरपुड्याची छापलेली निमंत्रण पत्रिकाही लक्षवेधी ठरली आहे. गुलाबी रंगाची ही निमंत्रण पत्रिका अधिकच उठावदार दिसते. पूर्वशी यांच्या नावातील अद्याअक्षर असलेलं ‘पी’ आणि मल्हार यांच्या नावातील ‘एम’ हे अद्याक्षर घेऊन ‘पीएम’ असा ठळक उल्लेख या निमंत्रण पत्रिकेवर करण्यात आला आहे. त्यामुळे पत्रिका उघडताच ‘पीएम’ ही अद्याक्षरे सर्वांची लक्ष वेधून घेतात. त्यानंतर वर्षा राऊत आणि संजय राऊत यांची नावे दिसतात. नंतर पूर्वशी आणि मल्हार यांची नावं असून त्यांचा साखरपुडा होत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यानंतर मल्हार यांच्या मातोश्री सीमा आणि वडील राजेश नार्वेकर यांची नावे आहेत. नंतर साखरपुड्याची तारीख आणि स्थळ देण्यात आलं आहे. तसेच निमंत्रकांमध्ये संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत, संदीप राऊत आणि सविता राऊत यांची नावे छापण्यात आली आहेत. (raut-narvekar family relation, who is rajesh narvekar?)
36 जिल्हे 72 बातम्या | 6 : 30 PM | 30 January 2021 https://t.co/4xwHzrRp67 #NEWS | #MararthiNews | #Mumbai | #maharashtra | #politics |
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 30, 2021
संबंधित बातम्या:
राऊतांच्या कन्येचा साखरपुडा; ठाकरे,पवार आणि फडणवीस भेटीचा पुन्हा एकदा योग!
धनुभाऊंना संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा यांचा आशीर्वाद प्राप्त : ह.भ.प. इंदुरीकर महाराज
(raut-narvekar family relation, who is rajesh narvekar?)