Loksabha Election : महायुतीचा मुंबईतील जागांचा सस्पेंस अखेर संपला आहे. कारण आज मुंबईत शिंदे गटानं 2 उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेनेने यामिनी जाधव आणि रवींद्र वायकर यांना तिकीट दिले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या संजय निरुपम यांना उमेदवारी मिळालेली नाही.
मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेनं आज दोन 2 उमेदवार जाहीर केल्यानंतर आता उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर विरुद्ध अमोल किर्तीकर तर दक्षिण मुंबईतून यामिनी जाधवा विरुद्ध अरविंद सावंत अशी लढत होणार आहे. काही दिवसांआधीच वायकर उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदेंकडे आले आहेत. महिन्याभराच्या आतच त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे.
विशेष म्हणजे वायकरांच्या उमेदवारीला मनसेनं उघड विरोध केला होता. भ्रष्टाचाऱ्याचा प्रचार आम्ही करायचा का ? असा सवाल मनसेच्या शालिनी ठाकरेंनी केला होता. आता वायकरांना तिकीट दिल्यानं शिंदेंच्या शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या संजय निरुपमांचाही पत्ता कट झाला आहे. काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर शिंदे गटात प्रवेश केला नसला तरी संजय निरुपम इच्छुक होते. मंत्री उदय सामंतांनीही त्यांची भेट घेतली होती.
दक्षिण मुंबईतून भाजपकडून राहुल नार्वेकर इच्छुक होते. त्यांनी प्रचारही सुरु केला होता. तसंच मंत्री मंगलप्रभात लोढांचंही नाव चर्चेत होतं. मात्र दक्षिण मुंबईची जागा स्वत:कडे ठेवण्यात शिंदेंना यश आलं आहे. आता मुंबईतल्या 6 पैकी 6 लढती निश्चित झाल्या आहेत.