मुंबई | 10 मार्च 2024 : ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांनी आज अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी रवींद्र वायकर यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. आपल्या मतदारसंघातील कामांसाठी आपण सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं रवींद्र वायकर यांनी यावेळी स्पष्ट केलं. यावेळी पत्रकारांनी त्यांना महत्त्वाचा प्रश्न केला. रवींद्र वायकर यांच्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून कथित जोगेश्वर भूखंड घोटाळा प्रकरणी तपास यंत्रणांचा तपास सुरु होता. वायकर यांची याप्रकरणी अनेकदा चौकशीसुद्धा झाली. त्यामुळे ईडीच्या कारवाईमुळे आपण शिंदे गटात प्रवेश करत आहात का? असा प्रश्न रवींद्र वायकर यांना विचारण्यात आला. कारण विरोधकांकडून तसे आरोप करण्यात येत आहेत. यावर वायकरांनी प्रतिक्रिया दिली.
“प्रामुख्याने ज्या काही यंत्रणा असतील, मी त्यांच्याकडे गेलो आहे. त्यांच्यासमोर सामोरं गेलो आहे. त्या यंत्रणाला जे काही सहकार्य हवं ते दिलेलं आहे. त्यामुळे कोर्टामध्ये जे काही झालं आहे आणि कशापद्धतीने होतंय ते तुम्हाला कळून आलेलं आहे. जे काही अशा पद्धतीच्या यंत्रणा असतील त्यांना सहकार्य देणं आणि त्यातून आपल्याला जे योग्य आहे, दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊण जातं”, अशी प्रतिक्रिया रवींद्र वायकर यांनी दिली.
सरकार विरोधकांना फंड देत नाही का? असा प्रश्न यावेळी वायकरांना विचारण्यात आला. त्यावर “आम्ही कोर्टातही गेलो होतो. फंड हा मिळाला पाहिजे आणि सत्तेत असल्यावर तो जास्तच मिळतो, असं वायकर म्हणाले. सत्तेशिवाय पर्याय नसतो. याबाबत मी सभागृहातही मांडलं आहे”, असं वायकर म्हणाले. त्यावर “सत्तेत म्हणून ते आले”, असं मुख्यंत्री म्हणाले. “अडीच वर्ष सत्ता होती तेव्हा कामे झाली असती तर ते आले असते का? मलाही त्या सरकारचा अनुभव आहे. रवींद्र वायकर यांना एकनाथ शिंदे यांच्यामुळे हे झालं, रवींद्र वायकर यांना एकनाथ शिंदे यांच्यामळे हे झालं ते सांगितलं जात होतं. पण आता आम्ही एकत्र आलो तेव्हा आमच्यातला संभ्रम दूर झाला आहे”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.