CSMT रेल्वे स्थानकावर RDX स्फोटक ठेवल्याचा धमकीचा फोन, सुरक्षा यंत्रणा अलर्ट

| Updated on: Aug 09, 2024 | 9:48 PM

अज्ञात इसमाने जीआरपी कंट्रोल रूमला फोन करत सीएसएमटी रेल्वे स्थानकावर आरडीएक्स ठेवल्याची धकमी दिली. या धमकीच्या फोननंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे. पोलिसांकडून रेल्वे स्थानकावर शोध घेतला जात आहे.

CSMT रेल्वे स्थानकावर RDX स्फोटक ठेवल्याचा धमकीचा फोन, सुरक्षा यंत्रणा अलर्ट
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी रेल्वे स्थानकावर आरडीएक्स ठेवल्याचा धमकीचा कॉल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात इसमाने जीआरपी कंट्रोल रूमला फोन करत सीएसएमटी रेल्वे स्थानकावर आरडीएक्स ठेवल्याची धकमी दिली. या धमकीच्या फोननंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे. जीआरपी कंट्रोल रूमला फोन येताच लोहमार्ग पोलीस कामाला लागले. लोहमार्ग पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी रेल्वे स्थानकावर शोधाशोध केली. पण अद्याप तरी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.

गेल्या काही दिवसांपासून अशाप्रकारे धमकीचे फोन आल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी आली होती. अज्ञात इसमांनी उत्तर प्रदेशातून पोलीस कंट्रोल रुमला फोन केल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे अशाप्रकारे फोन येण्याची ही पहिली-दुसरी वेळ नाही. याआधी देखील अशाप्रकारे धमकीचे फोन आले आहेत. पोलिसांकडून तातडीने तपास केला जातो. पोलीस युद्ध पातळीवर शोधाशोध करतात. धमकीचा फोन आल्यानंतर सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून तपास करुन काळजी घेतली जाते.

दिल्लीतही वारंवार बॉम्ब ठेवल्याची धमकी

देशाची राजधानी दिल्लीतही बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या गेल्या महिन्यात दिल्या होत्या. दिल्लीतील महाविद्यालये बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी आरोपींकडून देण्यात येत होती. दिल्लीतील रुग्णालयांमध्येही असा धमकीचा फोन येत होता. याशिवाय दिल्लीतील विमानतळही बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी दिली जात होती. त्यामुळे दिल्लीत भीतीचं वातावरण होतं. या धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस खूप सतर्क झाले होते. पोलिसांकडून युद्ध पातळीवर तपास केला जात होता.