विलास आठवले, टीव्ही 9 मराठी, मुंबई : मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यात यावं, अशी मागासवर्ग आयोगाने शिफारस केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात अभ्यास करणारा अहवाल मागासवर्ग आयोगाने तयार केला आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल 15 तारखेपूर्वी राज्य सरकारला सादर होण्याची शक्यता आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज गेल्या काही वर्षांपासून रस्त्यावर उतरत आहे. आधी 58 मूक मोर्चे, त्यानंतर ठोक मोर्चे काढत आरक्षणाची मागणी राज्य सरकारपर्यंत पोहोचवली. त्यानंतर राज्य सरकारने सुरुवातीला अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून विविध योजना आणून, मराठा समाजाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही आरक्षणाची मागणी मराठा समाजाने लावून धरल्यानंतर सरकारने मागासवर्ग आयोगाकडे अहवाल मागितला. तो अहवाल राज्य सरकारकडे 15 तारखेपूर्वी सादर होण्याची शक्यता आहे.
गेल्या 12 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात मराठा समाजाच्या वतीने उपोषण केले जात आहे. शिवाय, 15 तारखेपूर्वी आरक्षण मिळालं नाही, तर आणखी आक्रमक होण्याचा इशारा मराठा समाजाने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली सुद्धा वेगवान झाल्या आहेत.
त्यातच 19 तारखेपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनाआधी सरकारने मराठा आरक्षणासंबंधी काही हालचाली केल्या नाहीत, तर सभागृहातही याचे पडसाद उमटतील, यात शंका नाही.