मुंबई | 6 जानेवारी 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांच्या आरोपांना उत्तर देताना त्यांचे काका आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “रोहित पवार बच्चा आहे”, अशी मिश्किल टिप्पणी केली. “रोहित पवार बच्चा आहे, बच्चाच्याबद्दल जास्त बोलायचं नसतं. त्याच्या प्रश्नाला मी उत्तरे द्यावी एवढा काय तो मोठा झालेला नाही. माझे कार्यकर्ते, प्रवक्ते उत्तर देतील”, अशी खोचक प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. त्यांच्या या टीकेला रोहित पवार यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटरवर एक गाणं शेअर करत अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. “बच्चा है पर मन का सच्चा है! दिल है साफ, नफरत से है दूर”, अशा शब्दांत रोहित पवारांनी आपले काका अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं.
रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडीने काल छापे टाकले. ईडीने छापेमारी केली तेव्हा अजित पवार परदेशात होते. त्यानंतर ते आज मुंबईत दाखल झाले. त्यांनी आज सकाळी पत्रकार परिषद भूमिका मांडली. यावेळी त्यांनी या ईडी चौकशीवरुन अजित पवार गटाकडे बोट दाखवलं. “गेल्या सात दिवसात दिल्लीत कोण गेलं होतं? भाजपचं कोण गेलं होतं? आणि अजितदादा मित्र मंडळाचं कोण दिल्लीत गेलं होतं? त्यावरून या छापेमारी मागच्या काही गोष्टी समजून येईल”, असं रोहित पवार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याबाबत अजित पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी रोहित पवारांना बच्चा आहे, असा उल्लेख केला.
बच्चा है पर मन का सच्चा है!
दिल है साफ, नफरत से है दूर… pic.twitter.com/BUKnifhtTz— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 6, 2024
भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच पोलिसाच्या कानशिलात लगावली. त्यावरही रोहित पवार यांनी सकाळी प्रतिक्रिया दिली होती. “एक तर गेल्या दोन वर्षात भाजप आणि शिंदे यांचं सरकार आलं. तिथे चार ते पाच ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांना मारलं, धमकी दिली. यापूर्वी या महाराष्ट्रात असं कधी घडलं नव्हतं. ही नवी प्रथा आता या महाराष्ट्रात सुरू आहे. त्याचा निषेध आम्ही करतो. कांबळे हे भाजपचे आमदार आहेत. त्यांनी पोलीस अधिकाऱ्याला मारलं. अजितदादा मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यालाही मारलं. कुणासमोर मारलं तर अजितदादा मित्र मंडळाचे प्रमुख अजितदादा यांच्यासमोर मारलं. त्यावर अजितदादा काहीच बोलत नाहीत. त्यावरून बरंच काही समजून घ्या. त्या गोष्टी समजून घ्या”, असं सूचक विधानही त्यांनी केलं.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी एवढ्या कमी वयात रोहित पवार यांच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून? असा सवाल केला होता. त्यावरही रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “गेली 22 वर्ष मी व्यवसायात काम केलं. ते काय केलं आणि कसं केलं हे शिरसाट यांना वेगळं सांगतो. शिरसाट यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. त्यांना व्हायचंय मंत्री. दोन वर्ष मंत्री होता येत नाही. ते सकाळ संध्याकाळ विचार करत आहेत. त्यांना मंत्रिपदासाठी जे जे कपडे शिवले ते त्यांना येत नाही. त्यांनी टोपी शिवली असती तर तीही छोटी पडली असती. कारण त्यांचे विचार छोटे झाले. त्यामुळे त्यांचा मेंदूही छोटा झाला आहे. सत्तेसाठी तुम्ही विचार सोडून गेला आहात. पुरावे असेल तर या समोर”, असं आव्हानच रोहित यांनी संजय शिरसाट यांना दिलंय.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. “इतिहासात काय घडलं हे माहीत नाही. अध्यात्म ही व्यक्तिगत गोष्ट आहे. मी देवळात जातो. तसे अनेक लोक जातात. अशा विषयावर राजकीय स्टेटमेंट दिलं जातं, भाजपला तेच हवं असतं. दुष्काळ, बेरोजगारीवर सरकार काही बोलत नाही. पण आपण असं काही विधान केलं तर सरकारला कोलित मिळतं आणि ते याच गोष्टीवर चर्चा घडवून आणतात. त्याचा फायदा भाजपा नेहमी घेत आला आहे. आव्हाड अभ्यासू आणि मोठे नेते आहेत. मला योग्य आणि आयोग्य वाटतं ते बोलतो. हा माझा स्वभाव आहे. ते स्टेटमेंट या वातावरणात योग्य नव्हतं असं वाटलं. त्यावर मी बोललो”, अशी सावध प्रतिक्रिया त्यांना व्यक्त केली.