1 ऑगस्टला महाराष्ट्रात शासकीय सुट्टी जाहीर होणार? उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महत्त्वाचं पत्र

| Updated on: Jul 27, 2023 | 5:14 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एका महत्त्वाच्या विषयावर पत्र पाठवण्यात आलं आहे. या पत्रात 1 ऑगस्टला शासकीय सुट्टी जाहीर व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामागील कारण देखील तितकंच महत्त्वाचं सांगण्यात आलं आहे. त्यावर अजित पवार काय निर्णय घेततात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

1 ऑगस्टला महाराष्ट्रात शासकीय सुट्टी जाहीर होणार? उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महत्त्वाचं पत्र
Follow us on

मुंबई | 27 जुलै 2023 : साहित्यरत्न आणि क्रांतीसूर्य लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी महाराष्ट्राला दिलेलं साहित्य खूप अफाट आणि अद्भूत आहे. त्यांनी फक्त साहित्य चळवळ चालवली नाही. त्यांनी शोषित, वंचित आणि दलितांसाठी काम केलं. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांची ‘माणूस’ ही कादंबरी जगण्याचा मार्ग शिकवते. त्या काळातलं वास्तव मांडते. अण्णा भाऊ यांनी समाजाला, महाराष्ट्राला दिशा दाखवण्याचं काम केलं. त्यांनी लावण्या, छक्कड, कविता, गाणी, कादंबरी यातून प्रचंड समाजप्रबोधन केलं. विशेष म्हणजे त्यांचा स्वत:चा जीवनप्रवास हा अत्यंत अडचणींचा होता. पण त्यावर मार्ग काढत त्यांनी समाजासाठी काम केलं.

अण्णा भाऊ साठे यांना लोकशाहीर ही उपाधी सहज मिळालेली नाही. त्यांनी आपल्या साहित्यातून राज्याला आणि महाराष्ट्राला दिशा दाखवली. या महान साहित्यिक आणि समजासुधारकाच्या जयंती दिनी महाराष्ट्रात शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवार याबाबत काय निर्णय घेतात हे महत्त्वाचं ठरणार आहे.

नेमकी कुणी केली मागणी?

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 1 ऑगस्ट जयंती दिनी शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय खरात गट) यांच्याकडून करण्यात आली आहे. आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी याबाबत उपुमख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे.

उपमुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय?

“लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामध्ये झाला. अण्णाभाऊसाठे नंतरच्या काळामध्ये मुंबईत मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा मोठा प्रभाव पडला. त्यामुळे ते बोलताना म्हणाले, जग बदल घालुनी घाव, मज सांगून गेले भीमराव”, असं सचिन खरात यांनी उपमुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

“अण्णा भाऊ साठे यांची ओळख लोकशाहीर होतीच. पण त्याच्या पुढे जाऊन संयुक्त महाराष्ट्र राज्याचा जो लढा झाला या लढ्याचे अण्णा भाऊ अग्रणी नेते होते. तसेच ते कवी, लेखक, बहुजन नायक होते. त्यामुळे त्यांच्या जयंतीदिनी लाखो दलित समाज लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना वंदन करत असतो. त्यामुळे या सर्व बाबींची दखल घेऊन राज्य सरकारने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी”, अशी विनंती सचिन खरात यांनी पत्राद्वारे केली आहे.