मुंबई: महाविकास आघाडी सरकारने पुकारलेला बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे. या बंदमधून सरकारचा ढोंगीपणा उघड झाला आहे, असा हल्ला करतानाच आजचा बंद हा सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद आहे. या सरकारला थोडीही नैतिकता असेल तर हे सरकार संध्याकाळपर्यंत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करतील किंवा त्यांचा ढोंगीपणा उघड होईल, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा हल्ला चढवला. महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपण समोर आला आहे. हे पूर्णपणे ढोंगी सरकार आहे. लखीमपूरच्या घटने करता महाराष्ट्रात बंद केला जातो. पण महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी हे सरकार एकही पैसा देत नाही. शेतकरी संकटात आहे. हे सरकार आल्यापासून दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकारने बांधावर जाऊन 25 हजाराच्या घोषणा केल्या, 50 हजाराच्या घोषणा केल्या, पण या सर्व घोषणा हवेत विरल्या. विविध आपत्तीत मदतच केली नाही. केली तरी तोकडी केली. त्यामुळे घटक पक्षच म्हणून लागले भाजपचं सरकार बरं होतं. हे सरकार मदत करत नाही
त्यामुळे आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे, अस फडणवीस म्हणाले.
याच सरकारने मावळला पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. गोळीबार करणाऱ्यांना आंदोलन करण्याची नैतिकता तरी आहे का? असा सवाल करतानाच मावळमध्ये गोळीबार झाला तो जालियनवाला बाग होता, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. आजचा बंद संवेदना दाखवणारा नाही तर राजकीय पोळी भाजण्यासाठीचा आहे. या बंदला लोकांचा प्रतिसाद नाही. प्रशासनाची मदत घेऊन दमदाटी करून पोलीस, जीएसटी प्रशासनाचा वापर करून लोकांना बंद करायला भाग पाडलं जात आहे, असा दावाही त्यांनी केला.
तसंही या सरकारचं नाव बंद सराकर आहे. या सरकारने आल्यापासून योजना, अनुदानं बंद केल्या. कोरोना काळात महाराष्ट्र बंद केला. आता कुठे छोटे दुकानदार आणि व्यापाऱ्यांचं गाडं रुळावर येत असताना सरकारने बंद पुकारला. ईस्टर्न एक्सप्रेसवर दहा लोकांनी जाळपोळ केली. त्यावेळी पोलीस बघ्याची भूमिका घेत होते. धमक्या देऊन, दमदाटी करून बंद पुकारला जात आहे, असं ते म्हणाले.
सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई हायकोर्टाने बंद करण्यास मनाई केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने स्यूमोटो घेऊन अवमानना केल्याप्रकरणी या पूर्वी बंद पुकारला म्हणून शिवसेनेला दंड ठोठावला होता. सेनेने त्याची भरपाई भरली होती. त्यामुळे आजच्या बंदमध्ये जे काही नुकसान होईल, त्याची भरपाई ही सरकारकडून वसूल केली पाहिजे. कोर्टाने स्यूमोटोद्वारे या घटनेची दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
Media interaction, Mumbai https://t.co/qfgKECWQfN
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 11, 2021
संबंधित बातम्या:
दुकाने बंद करण्यासाठी सेना आमदार वैभव नाईकांचा व्यापारी दुकानदारांवर दबाव, Video व्हायरल
(Ruling MVA’s Maharashtra Bandh is state sponsored bandh, says devendra fadnavis)