मुंबई : यंदाचा पूर्वमोसमी आणि मोसमी पाऊस राज्याच्या अनेक भागांत झाला. मृगाच्या पहिल्या पावसाने सुखावलेल्या बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या. मान्सूनचा कमी झालेला जोर या आशेवर पाणी फेरणार का, अशी भीती व्यक्त होणे स्वाभाविक आहे. म्हणजे बळीराजावर लगेच दुबार पेरणीचे संकट ओढवेल असे नाही; पण मान्सून आणि लहरीपणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे कसे विसरता येईल ? मान्सूनच्या या ‘जोर’ बैठका आपल्या देशाला नवीन नाहीत, पण यंदा त्याच्या दमदार एण्ट्रीमुळे पल्लवित झालेल्या आशा-आकांक्षांचा जोर कमी करूनही चालणार नाही. फक्त मान्सूनने पुन्हा जोर धरावा आणि राज्यात सर्वत्र त्याच झोकात बरसावे इतकेच, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे. (Saamana Editorial Maharashtra Monsoon Rain Update)
मान्सूनने या वेळी अत्यंत झोकात आणि वेगात आगमन केले. अपेक्षेपेक्षा आधीच त्याने कोकण, मुंबई आणि परिसरात प्रवेश केला. राज्याच्या इतरही काही भागांत मृगाच्या पहिल्या सरींनी कृपावृष्टी केली. त्यामुळे बळीराजाही सुखावला आणि नद्या-नाल्यांनाही पाणी आले. मुंबईला तर पहिल्याच पावसाने भविष्यातील तडाख्यांची चुणूक दाखवली. मान्सूनचा उत्तरेकडील विस्तार आणि प्रवासदेखील वेगाने होत आहे. मान्सूनचे आगमन ते येथपर्यंतचे चित्र असे दिलासादायक असले तरी तीन-चार दिवसांतील घडामोडी झोकात आलेला मान्सून पुन्हा त्याच्या लहरीपणाकडे झुकतो की काय, अशी शंका निर्माण करणाऱ्या आहेत.
मान्सूनने राज्याचा बराच भाग व्यापला आहे, पण जो जोर त्याने आगमनप्रसंगी दाखविला तो काहीसा कमी झालेला दिसत आहे. म्हणजे ढग आहेत, काही प्रमाणात पाऊसही आहे, पण त्यात जोर नाही. अशी एक विचित्र परिस्थिती सध्या राज्यात दिसून येत आहे. मोसमी वारे सक्रिय आहेत. कमी दाबाचे पट्टेदेखील आहेत. तरीही मोठ्या भागात पाऊस गायब झाला आहे. म्हणजे 1 जून रोजी केरळमध्ये आलेल्या मान्सूनने 9 जूनपर्यंत कोकण, मुंबई परिसर धडाक्यात ओलांडला. त्या काळात मराठवाडा, विदर्भ आणि इतर काही भागांतही मृगाच्या पावसाने हजेरी लावली.
महाराष्ट्राशिवाय मान्सून त्याच वेगाने उत्तरेकडेही सरकला. दोन-तीन दिवसांपूर्वी त्याने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, प. बंगाल, बिहार, झारखंडमधील बऱ्याच भागांत हजेरी लावली. येत्या दोन दिवसांत तो दिल्ली, पंजाबपर्यंत मजल मारेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे सगळे ठीक असले तरी महाराष्ट्रात वेगात आलेला मान्सून अचानक ‘मंदावला’ का, हा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. 13 आणि 14 जून रोजी कोकणसह मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने ‘रेड ऍलर्ट’ जारी केला होता. 13 जूनच्या रविवारी तर मुंबईकरांनी गरज नसेल तर बाहेर पडू नये, असे इशारे-नगारेदेखील वाजविण्यात आले होते. मात्र हवामान खात्याच्या या अंदाजाचे ढोल अखेर फोलच ठरले.
हे दोन्ही दिवस पावसाने तर हुलकावणी दिलीच, उलट उन्हाच्या तडाख्याचा अनुभव नागरिकांना घ्यावा लागला. आताही कोकण, मुंबई आणि परिसरात वातावरण ढगाळ आणि पावसाळी असले, अधूनमधून तुरळक सरी येत असल्या तरी त्यात जोर नाही. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातून तो गायब झाला आहे. उत्तर महाराष्ट्राला पावसाची प्रतीक्षा आहे. विदर्भात कोसळणाऱ्या सरी तुरळक या श्रेणीत मोडणाऱ्या आहेत. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असला तरी एकंदरीत राज्याचा विचार करता मान्सूनचा ‘लंबक’ वेगाकडून मंदगतीकडे गेला आहे.
परिस्थिती अशीच राहिली तर ती खरीपाच्या पेरण्यांसाठी चिंतेची बाब ठरू शकेल. कारण या वेळी पूर्वमोसमी आणि मोसमी पाऊस राज्याच्या अनेक भागांत झाला. त्यामुळे त्या ठिकाणच्या पेरण्या पूर्ण झाल्या. मृगाच्या पहिल्या पावसाने सुखावलेल्या बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या.
(Saamana Editorial Maharashtra Monsoon Rain Update)
हे ही वाचा :
चिमुकल्या वेदिकालाही मिळालं 16 कोटीचं इंजेक्शन, खासदार अमोल कोल्हेंकडून ट्विटरद्वारे माहिती