सागर बंगला आणि वाय बी चव्हाण सेंटर बनलं तिकीट केंद्र, कोणी कोणी घेतली भेट?

| Updated on: Oct 18, 2024 | 9:54 PM

विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच इच्छूक उमेदवारांच्या भेटीगाठी सुरु झाला आहेत. सध्या नेते ज्या पक्षातून असून उमेदवारी मिळणार नसल्याचे संकेत मिळत आहेत ते नेते दुसऱ्या पक्षात जाऊन फिल्डिंग लावत आहेत, आज अनेक इच्छूक नेत्यांनी फडणवीस आणि शरद पवार यांची भेट घेतली आहे.

सागर बंगला आणि वाय बी चव्हाण सेंटर बनलं तिकीट केंद्र, कोणी कोणी घेतली भेट?
Follow us on

महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अमित शाह सोडवणार आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीत दाखल झालेत. रखडलेल्या 43 जागांचं वाटप अमित शाह करणार आहेत. महायुतीत जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि अजित पवार दिल्लीत आलेत. मुख्यमंत्री शिंदेही दिल्लीत येणार असून अमित शाहांच्या उपस्थितीत तोडगा निघणार आहेत. महायुतीत 288 पैकी 245 जागांवर आतापर्यंत तोडगा निघालाय. आता 43 जागांचं वाटप अमित शाहांच्या उपस्थितीत होणार आहे.

भाजप 155-160 जागांवर लढण्यास ठाम असल्याची माहिती आहे. दुसऱ्या नंबरवर शिंदेंची शिवसेना राहू शकते, शिंदेंच्या शिवसेनेला 70-75 जागा मिळू शकतात आणि जागा वाटपात अजित पवारांची राष्ट्रवादी 3 नंबरवर राहू शकते. दादांच्या वाट्याला 55-60 जागा मिळू शकतात. तर मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरुन रोहित पवारांनी मुख्यमंत्री शिंदेसह फडणवीसांनाही डिवचलंय. शिंदेंचा चेहरा निवडणुकीपुरताच राहिल आणि फडणवीसांना चेहरा केल्यास 20-30 जागांचं नुकसान होण्याची भीती अमित शाहांना असल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे.

दुसरीकडे तिकीटासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांकडे इच्छुक नेत्यांची रीघ लागली. सध्या सागर बंगला आणि वाय बी चव्हाण सेंटर तिकीट केंद्र झाली आहेत. शिवाजी पाटलांनी फडणवीसांची भेट घेतली. शिवाजी पाटील माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. चंदगड विधानसभेतून ते इच्छुक आहेत. पण ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीची असून सध्या राजेश पाटील आमदार आहेत.

राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिकांनी फडणवीसांची भेट घेतली. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून मुलगा कृष्णराज महाडिकांना तिकीट मिळावं यासाठी फिल्डिंग लावली आहे. पण जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे आणि राजेश क्षीरसागरांनी तयारी केली आहे.

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोतही फडणवीसांच्या भेटीला आले. वाळवा मतदारसंघातून स्वत: सदाभाऊ लढण्यासाठी इच्छुक आहेत. या जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा आहे. रणजीत पाटील यांनीही सागर बंगल्यावर फडणवीसांची भेट घेतली.
अमरावती पदवीधर मतदारसंघात पराभव झाला होता. आणि अकोला पूर्व मधून विधानसभा लढण्यास रणजीत पाटील इच्छुक आहेत.

माजी खासदार संजय काका पाटीलही फडणवीसांना भेटले. याआधी तासगाव कवठे महांकाळमधून तिकीटासाठी संजय काका अजित पवारांनाही भेटलेत. ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे असल्यानं भाजपला मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत. नारायण राणेंनीही फडणवीसांची भेट घेतली. कुडाळ मालवण मतदारसंघातून मुलगा नितेश राणे इच्छुक आहेत. मात्र मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेकडे असल्यानं कोणाला सुटणार यावरुन सस्पेंस आहे.

वर्सोव्याच्या आमदार भारती लव्हेकरांनीही फडणवीसांची भेट घेतली. लव्हेकरांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे, त्यामुळं त्यांनी फडणवीसांची भेट घेतली. माजी खासदार राजेंद्र गावित पालघर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत..लोकसभेत डावलल्यानं आता विधानसभेत तिकीटाची मागणी राजेंद्र गावितांची आहे.

इकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडेही दादा आणि शिंदेंचे नेते तिकीट मागण्यासाठी आले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण गंगापूर मधून इच्छुक आहेत. महायुतीत ही जागा भाजपकडे असल्यानं सतीश चव्हाण शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. दरम्यान पवारांच्या भेटीला आल्यानं अजित पवारांनी त्यांचं 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबन केलं.

शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनावणेंनी शरद पवारांची भेट घेतली. जुन्नरमधून ते इच्छुक आहेत. भाजपचे नेते लक्ष्मण ढोंबळेंनी मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी पवारांची भेट घेतली. माजी आमदार रमेश कदमांनीही शरद पवारांची भेट घेतली…मोहोळमधून रमेश कदम तुतारीवर लढण्यास इच्छुक आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे सोमेश क्षीरसागरही पवारांच्या भेटीला आले. तेही मोहोळमधूनच इच्छुक आहेत.


भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजित सिंग मोहिते पाटीलही भेटीसाठी आले होते..पण न भेटताच ते निघून गेले. रणजित सिंग मोहिते माढ्यातून लढण्यास इच्छुक आहेत. 22 तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे आणि पुढच्या 2 दिवसांत पहिली यादीही येण्याची शक्यता आहे. त्यामुळंच उघडपणे तिकीटासाठी भेटीगाठी सुरु झाल्या आहेत.