devendra fadnavis sagar’ bungalow: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या कामगिरीकडे देशाचे लक्ष लागले आहे. भाजपमध्ये व्यक्ती केंद्रीत राजकारण होत नव्हते. पक्षाची सूत्र पक्षाच्या मुख्यालयातून चालत होती. परंतु आता भाजपमध्ये बदल होऊ लागला आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची एकहाती सूत्र भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांभळणार आहे. त्यामुळे भाजपची पहिली यादी जाहीर होताच देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला सत्तेच्या केंद्रस्थानी आला आहे. तिकीट इच्छूक, नाराज आणि तिकीट मिळालेले सर्वच लोक देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहचत आहेत.
पुण्यातील खडकवासला विधानसभा विद्यमान आमदार भीमराव तापकीर सागरवर दाखल झाले आहे. भीमराव तापकीर यांचे नाव पहिल्या यादीत नाव नाही. मावळचे आमदार सुनील शेळके विरोधातील भाजपचे बाळा भेगडे ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आला आहे.
अंधेरी पूर्व येथून इच्छुक मुरजी पटेल देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला सागर बंगल्यावर आले आहे. भाजपकडून अंधेरी पूर्व येथे पोटनिवडणुकीत मुरजी पटेल यांनी अर्ज भरला होता. परंतु अर्ज भरल्यानंतर पक्षाने सांगितल्याने त्यांनी माघार घेतली होती. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके पोटनिवडणुकीत विजयी झाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत या भागातून महायुतीला मताधिक्य मिळाले होते.
मुंबईतील भाजपच्या १४ जागा जाहीर झाल्या आहेत. मात्र वर्सोवा मतदारसंघ वेट अँड वॉचवर ठेवण्यात आलेला आहे. यामुळे वर्सोवा मतदारसंघातील आमदार भारती लव्हेकर फडणवीस यांच्या भेटीला आल्या आहेत. बोरिवली सुनिल राणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आले आहे. पहिल्या यादीत सुनील राणेंचे नाव नाही. त्यामुळे ते फडणवीस यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहे.
मुंबादेवीचे माजी आमदार अतुल शाह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आले आहे. मुंबादेवी येथून अतुल शाह इच्छुक आहेत. मुंबादेवी मतदारसंघावरून राष्ट्रवादी व भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. काँग्रेस आमदार अमिन पटेलांविरोधात शाह मैदानात उतरण्यास इच्छुक आहेत.
बबनराव पाचपुते हे त्यांची पत्नी प्रतिभा पाचपुते यांच्यासोबत सागर बंगल्यावर आले आहेत. प्रतिभा पाचपुते यांना भाजपकडून कालच उमेदवारी जाहीर झाली. मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी म्हणून दोघेही आग्रही आहेत.
आमदार सत्यजित तांबे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आले आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे असलेले सत्यजित तांबे हे नाशिक पदवीधरचे आमदार आहेत.सत्यजित तांबे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आल्यामुळे राजकीय चर्चा जोरात सुरु झाल्या आहेत.