mumbai housing demand: मुंबईत हक्काचे घर घेण्याचे अनेकांची स्वप्न असते. मध्यमवर्गीयांना मुंबईत घर घेणे शक्य नसल्यामुळे उपनगरांमध्ये घरे घेतली जातात. यामुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये घरांची विक्री वाढली आहे. जुलैमध्ये मुंबईत १२ हजार १३३ घरांची विक्री झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत त्यात १६ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मागील वर्षी मुंबईत एकूण १० हजार २२१ मालमत्तांची विक्री झाली होती. यंदा झालेल्या विक्रीमुळे राज्य सरकारला १०४७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. यावर्षी जूनमध्ये ११ हजार ६४३ घरे विकली गेली होती. जुलैमध्ये यात काही वाढ झाली आहे. घर घेण्यासाठी ग्राहकांची पसंती पश्चिम आणि पूर्व उपनगराला मिळाली आहे. मध्य मुंबईतील घरांच्या विक्रीतही वाढ झाल्यामुळे पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये विक्रीचे प्रमाण ७३ टक्के झाले आहे.
सन २०२४ मध्ये मुंबईतील घरविक्री दरमहा १० ते १४ हजारांच्या दरम्यान राहिली आहे. जानेवारी महिन्यात १० हजार ९६७ घरांची विक्री झाली होती. फेब्रुवारी महिन्यात त्यात वाढ झाली. ती विक्री १२ हजार ५६ झाली. त्यानंतर मार्च महिन्यात घरांची विक्री वाढली. १४ हजार १४९ घरांची विक्री झाली होती. त्यामुळे राज्य शासनाला सर्वाधिक १ हजार १२३ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. एप्रिलमध्ये घरांची विक्री कमी झाली. या महिन्यात ११ हजार ६४८ तर मे मध्ये १२ हजार आणि जूनमध्ये ११ हजार ६७३ घरांची विक्री झाली होती. या वर्षी सर्वाधिक घरविक्री ही मार्चमध्ये झाली होती.
जूनच्या तुलनेत जुलैमध्ये घरविक्रीत काहीशी वाढ झाली आहे. जुलैमध्ये मुंबईतील १२ हजार १३३ घरांची विक्री झाली आहे. त्यातून राज्य सरकारला १०४७ कोटी रुपयांचा महसूल मुद्रांक शुल्क वसुलीच्या रुपाने मिळाला आहे. पावसाळ्यात घरविक्रीत काहीशी घट दिसून येते. पावसाळा संपल्यानंतर, सणासुदीचे दिवस सुरु झाल्यानंतर घरविक्रीत वाढ होते. त्यानुसार दसरा-दिवाळी दरम्यान घरविक्रीत चांगली वाढ होईल, अशी अपेक्षा बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांना आहे.
जानेवारी ते जुलै दरम्यान मुंबईत एकूण 84 हजार 653 घरांची विक्री झाली. यापूर्वी 2023 मध्ये या कालावधीमध्ये 72 हजार 713 घरांची विक्री झाली होती. मुंबईतील घरांच्या विक्रीचे प्रमाण 16% वाढले आहे. त्यामुळे 6,929 कोटी रुपयांची कमाई राज्य सरकारची झाली आहे.