सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या टीमने आरोपींच्या मुसक्या गुजरातमधून आवळल्या आहेत. गोळीबार करुन गुजरामधील भुज जिल्ह्यात आरोपी पळाले होते. विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल अशी आरोपींची नावे आहेत. दोन्ही बिहारमधील रहिवाशी आहेत.
रविवार १४ एप्रिल रोजी अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील निवासस्थानी दोघांना गोळीबार केला होता. सलमानच्या गॅलॅक्सी अपार्टमेंटवर पहाटेच्या सुमारास गोळीबाराची घटना घडल्यानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी तातडीने पावले उचलली. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच तपासासाठी २० पथके तयार केली होती. पोलीस तपासातून नवनवीन खुलासे समोर येत होते. दोघे आरोपींनी सलमान खानच्या घरावर चार गोळ्या झाडल्या होत्या.
ताब्यात घेतलेले दोन्ही हल्लेखोर पनवेल परिसरात वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे हल्लेखोर काही दिवसांपूर्वी हरिग्राम येथील राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये फ्लॅट भाड्याने घेऊन वास्तव्यास होते. तेथील घर मालकाशी केलेल्या करारनाम्याच्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी नवीन पनवेलमधील एका दुचाकी शोरूममधून गाडी विकत घेतली व त्यासाठीसुद्धा त्यांनी तेच कागदपत्रे दिले होते.
मुंबई पोलीस, क्राईम ब्रांच, ATS व स्थानिक पोलीस यांनी आरोपींचा कसून शोध घेतला. पनवेलमधील वास्तव्य उघडकीस आल्यानंतर त्या अपार्टमेंटमधील घराचा मालक तसेच जी दुचाकी वारली त्याच्या शोरूमच्या मालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. घर मालकाचे नाव राहुल भोपी आहे. आरोपींना घर भाड्याने देताना करारनामा झाला होता का? करारनाम्यासाठी आरोपींनी दिलेली कागदपत्रे खरी होती की खोटी ? याचा मुंबई पोलीस शोध घेत आहेत. मुंबई पोलिसांचा तपास चोहोबाजूने सुरु असताना आरोपी गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सोमवारी रात्री दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.