नंदकिशोर गावडे, Tv 9 मराठी, मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठकांचं सत्र सुरु आहे. सत्ताधारी पक्षांमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेतही धुसफूस सुरु झाल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपमध्ये मोठी नाराजी असल्याची माहिती समोर आली होती. भाजपचे कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे हे नाराज असून ते मोठा निर्णय जाहीर करण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आज मुंबईत महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत.
आमदार हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर भाजपचे कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे हे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. विशेष म्हणजे त्याकाळात समरजित घाटगे यांचा फोन दोन ते तीन दिवस नॉट रिचेबल होता. त्यानंतर समरजित घाटगे यांनी 6 जुलैला शक्तीप्रदर्शन करत आपण भाजपसोबत असल्याचे स्पष्ट केलं होतं. तसेच देवेंद्र फडणवीस आपले नेते असून त्यांच्याकडे आपण आपली नाराजी मांडू, असं ते म्हणाले होते. त्यानंतर आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.
नाराजी नाट्यानंतर समरजित घाटगे यांनी देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे. कागलचा कोंढाणा मीच जिंकणार, असं म्हणत हसन मुश्रीफ यांच्या विरुद्ध 6 जुलैला समरजित घाटगे यांनी येणाऱ्या आमदारकीचं रणशिंग फुंकलं होतं. मात्र त्यांची नाराजी ही कायम असल्याचं पाहायला मिळत होतं. त्यानंतर आज त्यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे.
समरजित घाटगे यांनी आज रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी ‘सागर ‘बंगल्यावर ही भेट झाली. यावेळी अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. समरजित घाटगे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास 1 तास चर्चा झाली. चर्चेत पक्षाची भूमिका सांगत समरजित घाटगे यांची नाराजगी दूर करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.