‘देवेंद्र फडणवीस संवेदना विसरलेत का?’, संभाजीराजे छत्रपती संतापले, नेमकं प्रकरण काय?

| Updated on: Jul 04, 2024 | 4:57 PM

संभाजीराजे छत्रपती आज चांगलेच संतापले. त्यांनी पत्रकार परिषद घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत काही प्रश्न उपस्थित केले. विशेष म्हणजे संभाजीराजे यांनी येत्या 9 जूनला विधान भवनावर मोर्चा घेऊन धडक देण्याचादेखील इशारा दिला आहे.

देवेंद्र फडणवीस संवेदना विसरलेत का?, संभाजीराजे छत्रपती संतापले, नेमकं प्रकरण काय?
संभाजीराजे छत्रपती संतापले
Follow us on

छत्रपती घराण्याचे कोल्हापूर गादीचे वंशज तथा राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे ड्रीम 11 आणि रम्मी सर्कस सारख्या ऑनलाईन खेळांवर चांगलेच संतापले आहेत. या खेळांच्या मुद्द्यावरुन संभाजीराजे यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला आहे. त्यांनी संबंधित ऑनलाईन गेम बंद करण्याची मागणी केली आहे. “ड्रिंक अँड ड्राईव्ह आणि हिट अँड रन असे वाईट प्रकार महाराष्ट्रात होत आहेत. सरकार आपल्यासोयीनुसार झाकून चाललं आहे. पण असाच एक प्रकार मला मांडायचा आहे. आपण मोबाईलमध्ये यूट्यूब उघडलं तर जाहिरात पहायला मिळते. रम्मी सर्कल, जंगली रम्मी, ड्रीम 11 अशा जाहिराती बघायला मिळतात. विशेष म्हणजे मोठमोठे कलाकार त्याची जाहिरात करतात. त्यात शेतकरी अडकला आहे, सामान्य लोकांची घरे उद्ध्वस्त होत आहेत. आता सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे”, अशी टीका संभाजीराजे छत्रपती यांनी केली.

“मटका खेळला की अटक होते. मात्र ऑनलाईन जुगार खेळला की काही नाही. लोक बेरोजगार होत चालले आहेत. आत्महत्या करत आहेत. मला माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या निर्णयाची आठवण येते. त्यांनी निर्णय घेतला होता, डान्स बार बंद केले होते. त्यांनी धाडसी निर्णय घेतला होता”, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

‘देवेंद्र फडणवीस संवेदना विसरले का?’

“राज्याला डान्स बारमधून महसूल मिळत असेल तरी काही लोक बरबाद होत आहेत. मात्र ते बोलले की दुसरे काही असेल महसूल मिळवून देण्यासाठी. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता काय उत्तर दिलं ते व्हिडिओत बघा. देवेंद्र फडणवीस यांना मी ओळखतो. ते हुशार आहेत. ते संवेदना विसरले का? माझा प्रश्न गृहमंत्र्यांना आहे. लोक आत्महता करत आहेत. आपण काय करता?”, असा सवाल संभाजीराजे यांनी केला.

‘9 तारखेला विधान भवनावर धडकणार’

“27 टक्के जीएसटी मिळतो. आमच्या पक्षाने पुणे पोलिसांना विचारलं. ते बोलले हे ऑनलाईन सगळं अनधिकृत आहेत. आर आर पाटील यांच्याप्रमाणे धाडसी निर्णय या सरकारने घ्यावा. हे ड्रीम11 हे सगळं बोगस आहे. तुम्ही उत्तर दिलं नाही तर आमचा पक्ष विधानभावनात धडकनार. आमचा पक्ष 9 तारखेला विधान भवनावर धडकणार”, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला. “आसाम राज्याने हा ऑनलाईन जुगार बंद केला आहे. मात्र महाराष्ट्रात का नाही?”, असादेखील सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला.