मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी (28 मे 2021) मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणावर आपली जाहीर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी सारथी संस्थेची चांगली अंमलबजावणी झाली तर सारथी मराठा आरक्षणालाही भारी पडेल, असं मोठं विधान केलंय. सारथी संस्थेचा विषय हा माझ्या आणि मराठा समाजातील ह्रदयातील विषय असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच सारथी संस्थेला किमान दरवर्षी 1000 कोटी रुपयांचा निधी देण्याचीही मागणी केली (Sambhajiraje Chhatrapati on Maratha reservation and Sarathi scheme).
“चांगली अंमलबजावणी केली तर सारथी संस्था आरक्षणापेक्षा उपयोगी ठरेल”
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “सारथी हा विषय माझ्या आणि समाजाच्या ह्रदयातील विषय आहे. सारथी संस्था शाहू महाराजांच्या नावाने उभी केलेली संस्था आहे. त्याची काय अवस्था करुन टाकली आहे. सरकारने सारथीला स्वायत्तता देऊन त्याची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी केली तर आगामी काळात आरक्षणापेक्षा सारथी चांगली ठरेल. मी हे मोठं विधान करतो आहे. आरक्षण आपल्या हक्काचं आहे, पण चांगली अंमलबजावणी झाली तर सारथी आरक्षणापेक्षा जास्त उपयोगी ठरेल. सारथीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना घडवलं जाणार आहे.”
“उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आम्ही सारथीला जागा दिली. त्यांनी जागा द्यायलाच पाहिजे, पण नुसतं जागा देऊन होणार नाहीये. स्वायत्तता म्हणजे फक्त 9 माणसं ठेवणं नाही. ज्याला समाजाचं काही समजतं, जो जमिनीवर काम करतो, ज्यानं आपलं आयुष्य समाजासाठी दिलंय त्यांना त्या समितीत घेतलं पाहिजे. सगळे आयएएस अधिकारी घेतले आहेत. त्यातील काही निवृत्त आहेत. ते काय करणार आहेत, त्यांना समाजाशी काय देणंघेणं आहे? जर सारथी मराठा समाजासाठी काढली आहे तर समाजातीलही 2-3 चांगली माणसं घ्यायला हवी,” असं संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “पत्रकार म्हणतील तुम्ही मागणी करत आहेत तर तुम्हालाच अध्यक्षपदाची इच्छा असेल. मला ते अध्यक्षपद अजिबात नकोय. चांगली लोकं घ्या. सारथीसाठी कमीत कमी 1000 कोटी रुपये द्यायला पाहिजे. सरकार म्हणेल कोविडच्या काळात कुठून आणायचे पैसे तर ती परिस्थिती मान्यच आहे. पण तुम्ही आधी मंजूरी द्या. आम्ही या निधीचे 1,2,3 असे टप्पे करतो, या वर्षात करु. 2 वर्षात हजार कोटी द्या. पुन्हा तिसऱ्या वर्षी हजार कोटी द्या. त्याचा आम्ही व्यवस्थित मास्टर प्लॅन करु.”
“तुम्ही आत्ताच 50 कोटी रुपये दिले तर त्यात काय नियोजन करायचं? असं करु नका. निधी द्यायचा तर मनापासून द्या नाही तर बंद करुन टाका. शाहू महाराजांचं नाव त्या संस्थेला देऊ नका. जर निधी द्यायचा नाही तर कशाला शाहू महाराजांचं नाव ठेवायचं, मला त्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बोलवायचं. त्यावेळी ते वेगळं सरकार होतं. हे नको, आता हे बस झालं,” असंही त्यांनी नमूद केलं.
हेही वाचा :
व्हिडीओ पाहा :
Sambhajiraje Chhatrapati on Maratha reservation and Sarathi scheme